अकोला: जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार होत नसून त्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे वृत्त 'लोकमत'ने मंगळवारी प्रकाशित करताच शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच बुलढाणा, वाशिम व अमरावती जिल्ह्यातील रुग्णही उपचारासाठी दाखल होतात. रुग्णालयामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची कुचंबना होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता व घाण पसरल्याचे चित्र पाहावयास मिळते. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शहर शिवसेनेच्यावतीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.
तूर्तास आदोंलन मागेपुढील सात दिवसात रुग्णांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शहर संघटक तरुण बगेरे, मंगेश काळे, गजानन चव्हाण, नितिन मिश्रा, शरद तुरकर, मंजूशा शेळके, सुनीता श्रींवास, अनीता मिश्रा, पंकज जायले, आस्तिक चव्हाण, देवा गावंडे, नितिन ताथोड, रोशन राज, राजेश इंगळे, रुपेश ढोरे, रमेश गायकवाड, संतोष रनपिसे, गणेश बुंदेले, किरण येलवंनकर, लक्ष्मण पंजाबी, सुनील दुर्गिया, संजय अग्रवाल, पंकज श्रीवास, संजय अण्णा, मोहन वसु पाटील, विश्वास शिरसाट यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.