अकोला: कर्नाटक येथील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याचे तीव्र पडसाद जिल्ह्यात उमटले. जिल्हा शिवसेनेच्यावतीने सोमवारी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या पुतळ्याचे दहन करीत निषेध व्यक्त केला. कर्नाटक येथील बेळगाव मधील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा बसविण्यात आला होता. हा पुतळा कर्नाटकमधील भाजप सरकारने तातडीने हटविला. कर्नाटकमधील भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हाभरात विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविला. शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या मार्गदर्शनात शहरातील मदनलाल धिंग्रा चौकात कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचा पुतळा जाळण्यात आला. यादरम्यान, शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव पद्धतीने आंदोलन छेडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला. तसेच जय हिंद चौक परिसर, शिवनी-शिवर येथील राष्ट्रीय महामार्ग यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी कर्नाटक सरकारच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. कर्नाटक सरकारने सन्मानाने छत्रपती शिवरायांचा पुतळा त्याच ठिकाणी पुन्हा बसवावा. अशी मागणी यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी केली.
यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेच्या आंदोलनावर पोलिसांची करडी नजर कर्नाटक सरकारच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने जिल्हाभरात विविध ठिकाणी आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. शिवसेनेतर्फे अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पृष्ठभूमीवर पोलिस प्रशासनाच्यावतीने सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.