अकोला: विधानसभा निवडणुकीमध्ये शहरातील एक आणि ग्रामीण भागातील दोन अशा एकूण तीन विधानसभा मतदारसंघांसाठी आग्रही असल्याची भूमिका शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्यासमक्ष पार पडलेल्या बैठकीत शिवसेना, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. शुक्रवारी स्थानिक विश्रामगृहावर पार पडलेल्या बैठकीत जागा वाटपादरम्यान तीन विधानसभा मतदारसंघांची मागणी करण्याचा रेटा पदाधिकाऱ्यांनी लावून धरला. या बैठकीमुळे शिवसेना-भाजपच्या स्थानिक राजकारणात भूकंप येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळाल्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मागील अडीच वर्षांच्या कालावधीत शिवसेनेने जिल्ह्यात पक्ष बांधणीच्या जोरावर कात टाकल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत आगामी आॅक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहापैकी तीन मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला यावेत, या उद्देशातून शुक्रवारी सेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकाºयांची बैठक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने शहरी भागातील अकोला पूर्व तसेच अकोला पश्चिम मतदारसंघापैकी एक आणि ग्रामीण भागातील दोन मतदारसंघांचा रेटा यावेळी लावून धरण्यात आला. यासंदर्भात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यावरही चर्चा करण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख अतुल पवनिकर (अकोला पूर्व), शहर प्रमुख राजेश मिश्रा (पश्चिम), डॉ. विनीत हिंगणकर, हरिभाऊ भालतिलक, संतोष अनासने, तरुण बगेरे, नगरसेवक गजानन चव्हाण, युवा सेना जिल्हाधिकारी विठ्ठल सरप, अर्जुन गावंडे, शरद तुरकर, योगेश गीते, मनोज बाविस्कर, संजय अग्रवाल, केदार खरे, अभिषेक खरसाडे, योगेश अग्रवाल, सुरेंद्र विसपुते, राहुल कराळे, नितीन मिश्रा, कुणाल पिंजरकर, सहसंपर्क संघटिका ज्योत्स्ना चोरे, जिल्हा संघटिका देवश्री ठाकरे, नीलिमा तिजारे, सुनीता श्रीवास, सरिता वाकोडे, वर्षा पिसोडे, सीमा मोकळकर यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाप्रमुख, लोकप्रतिनिधी अनभिज्ञशिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया बाहेरगावी आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमुळे राजकीय क्षेत्रातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दुय्यम दर्जाची वागणूकशहरी भागातील अकोला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचा आमदार नसल्यामुळे शिवसैनिकांसह सामान्यांची कामे होत नाहीत. याशिवाय मित्रपक्षातील लोकप्रतिनिधी दुय्यम आणि हीन दर्जाची वागणूक देत असल्याचा पाढा यावेळी वाचण्यात आला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शहरी भागातील एक मतदारसंघ शिवसेनेकडे घ्यावा,असा सूर यावेळी उमटला.