अकोला: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींच्या घरकुलांची प्रकरणे प्रशासन ताटकळत ठेवत असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह सेना नगरसेवकांनी सोमवारी थेट महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडले. तब्बल चार तास ठाण मांडून बसलेल्या सेना नगरसेवकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश आयुक्त कापडणीस यांनी संबंधित विभाग प्रमुखांना जारी केले.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची प्रकरणे बांधकाम व नगररचना विभागाकडून जाणीवपूर्वक ताटकळत ठेवल्या जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. घरकुलांची अर्धवट बांधकामे करूनही लाभार्थींच्या बँक खात्यात उर्वरित आर्थिक मदत जमा केली जात नसल्याची परिस्थिती आहे. घरकुलांचा प्रश्न निकाली काढण्यासोबतच गत काही दिवसांपासून शौचालयांचा घोळ व नुकत्याच उघडकीस आलेल्या फोर-जी केबल प्रकरणी मनपा प्रशासन काहीही ठोस निर्णय घेत नसल्याचे ध्यानात घेता सोमवारी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्यासह सेना नगरसेवकांनी थेट आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात ठिय्या दिला. आयुक्तांच्या दालनात जमिनीवर बसून राजेश मिश्रा यांनी नगररचना विभाग, बांधकाम विभाग, जलप्रदाय आणि विद्युत विभागाच्या विभाग प्रमुखांसोबत चर्चा केली.सेना नगरसेवकांचा संताप व चीड लक्षात घेता प्रलंबित विषय तातडीने निकाली काढण्याचे निर्देश मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.यावेळी नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक मंगेश काळे, गजानन चव्हाण, शशिकांत चोपडे, नगरसेविका अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सपना नवले, के दार खरे, रूपेश ढोरे, सतीश यादव, राजेश राऊत यांच्यासह नगररचना विभागाचे प्रभारी सहायक संचालक पी. दांदळे, सहायक नगररचनाकार संदीप गावंडे, शहर अभियंता सुरेश हुंगे व विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे उपस्थित होते.
फोर-जी प्रकरणात कारवाई का नाही?गत काही दिवसांपासून ‘लोकमत’मध्ये मनपाच्या परवानगीशिवाय शहरात फोर-जी केबलचे जाळे टाकल्या जात असल्याचे वृत्त प्रकाशित होत आहे. काही मोबाइल कंपन्यांनी मनपाला ३० कोटींचा चुना लावल्यानंतरही प्रशासन ठोस कारवाई का करीत नाही, असा सवाल राजेश मिश्रा यांनी उपस्थित केला. फोर-जीसह शौचालय घोटाळ्यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.आमदारांनी केली आयुक्तांसोबत चर्चाशिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या दिल्याचे समजताच आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी मनपात धाव घेऊन आयुक्त कापडणीस यांच्यासोबत चर्चा केली. नगरसेवकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्याची सूचना यावेळी आ. बाजोरिया यांनी केली.विद्युत विभाग अनभिज्ञशहरात रॉयल व ईईएसएल कंपनीकडून एलईडी पथदिवे उभारण्यात आले. एलईडीचा पुरवठा विस्कळीत झाला असून, पथदिवे नादुरुस्त आढळल्यास कंपनीला दंड आकारण्याची तरतूद आहे. आजपर्यंत किती दंड वसूल केला, अशी राजेश मिश्रा यांनी विचारणा केली असता, विद्युत विभागाने थातूरमातूर उत्तरे दिल्याचे समोर आले.