अकोला : प्रधानमंत्री आवास याेजनेच्या अंतर्गत घरकुलांचा लाभ, गुंठेवारी प्रकरणातील घरपट्टे, अमृत याेजनेच्या कामांमुळे ठिकठिकाणी उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, हिंदू स्मशानभूमीसाठी जागेची उपलब्धता अशा विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शहर शिवसेनेने सोमवारपासून मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या दिला हाेता. अखेर मनपा आयुक्तांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेने मंगळवारी दुपारी आंदोलन मागे घेतले.
प्रधानमंत्री आवास याेजनेच्या अंतर्गत घरकुलांचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थींची फरपट हाेत आहे. यासंदर्भात आयुक्तांशी झालेल्या चर्चेत त्यांनी या याेजनेतील अडचणी दूर करून लाभार्थींना दिलासा देण्याचे आश्वासन दिले हाेते; मात्र त्यावर काेणतीही कारवाई केली नाही. यावेळी साग्रसंगीत गाेंधळ घालून मनपा प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी शिवसेना नगरसेवकांना समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे मंगळवारी शिवसेनेने आंदोलन मागे घेतले.
यावेळी शिवसेनेचे गटनेेते राजेश मिश्रा यांच्यासह नगरसेवक गजानन चव्हाण, मंगेश काळे, मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, सपना नवले, शशी चोपडे आदींनी मनपा आयुक्तांना या आंदाेलनाद्वारे इशारा दिला आहे.