- आशिष गावंडे
अकाेला: शहरातील मालमत्तांचे पुनर्मुल्यांकन करण्यासाेबतच टॅक्स, पाणीपट्टी व बाजार वसूलीसाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या स्वाती एजन्सीसह तत्कालीन सत्ताधारी भाजपच्या विराेधात शिवसेनेच्यावतीने (ठाकरे गट)एल्गार पुकारण्यात आला. शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात टॅक्स वसूली व मनपातील भ्रष्ट कारभाराविराेधात गुरुवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरातून घराेघरी जाऊन पत्रक वाटपाला प्रारंभ करण्यात आला.
शहरवासियांकडून मालमत्ता कर वसूलीसाठी महापालिकेचे कर्मचारी सक्षम असताना मनपा प्रशासनाने भारतीय जनता पार्टीच्या दबावातून कर वसूलीसाठी स्वाती एजन्सीची नियुक्ती केली. पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीच्या घशात किमान ५० ते ५२ काेटी रुपयांचे देयक अदा केले जाणार असून मनपाच्या तिजाेरीची लुट केली जात असल्याचा आराेप शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी केला. एजन्सीची नियुक्ती प्रक्रिया संशयास्पद असल्यामुळे टॅक्स वसूलीचा कंत्राट रद्द करुन टॅक्स जमा न करण्याचे आवाहन मिश्रा यांनी नागरिकांना केले. यासाठी घराेघरी जाऊन पत्रक वाटण्याच्या माेहीमेला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाप्रमुख विकास पागृत, मुकेश मुरुमकार, अतुल पवनीकर, शहर प्रमुख (अकाेला पुर्व) राहुल कराळे, अभय खुमकर, जोस्ना चोरे यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
व्यापाऱ्यांना दिली माहितीशहरात तब्बल एक लाख मालमत्ता धारकांच्या घरी जाऊन त्यांना पत्रकाचे वाटप केले जाणार आहे. पत्रकात मागील पाच वर्षांच्या कालावधीत मनपात झालेल्या भ्रष्ट कारभाराच्या मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे. राजेश्वर मंदिरापासून ते मुख्य बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांना टॅक्सच्या मुद्यावर माहिती देण्यात आली. मनपातील अनेक अधिकाऱ्यांना पत्रके देण्यात आली.