लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाच्या जाचक अटी रद्द करून सर्वसामान्यांना त्वरित घरकुल देण्याची मागणी करीत शिवसेनेच्या आमदार, जिल्हाप्रमुख, नगरसेवकांसह जुने शहरातील शिवसेना वसाहतमधील असंख्य नागरिकांनी सोमवारी महापालिकेवर धडक दिली. केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणीला घरघर लागण्याची चिन्हे दिसत आहेत. मनपा क्षेत्रात शून्य कन्सलन्टसीने केलेल्या सर्व्हेनुसार योजनेच्या पहिल्या टप्प्यात झोपडपट्टी भागाचा सर्व्हे करण्यात आला. जुने शहरातील शिवसेना वसाहत, न्यू गुरुदेवनगर, रामदासपेठ परिसरातील मातानगर आदी भागातील १ हजार २४१ घरकुलांसाठी पात्र लाभार्थींची निवड केली. पहिल्या टप्प्यात झोपडपट्ट्यांचा सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर शिवसेना वसाहतमधील ५४ घरकुलांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. योजनेचे स्वरूप क्लिष्ट असल्यामुळे पात्र लाभार्थींना त्यांच्या अपेक्षेनुसार घरकुलाचे बांधकाम करणे शक्य होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात ठोस माहिती देण्यात शून्य कंपनी अपयशी ठरत असल्याची परिस्थिती आहे; पात्र लाभार्थींना ३२२ चौरस फुटाचे बांधकाम करण्यासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख रुपये तर राज्य शासनाकडून १ लाख रुपये असे एकूण अडीच लाख रुपये अनुदान दिले जाईल. त्याव्यतिरिक्त बँकेमार्फत सव्वा लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल; मात्र ३२२ चौरस फुटापेक्षा अधिक बांधकाम करायचे असल्यास तशी परवानगी दिली जात नसल्याचा मुद्दा शिवसेना वसाहतमधील लाभार्थींनी उपस्थित केला आहे. शिवाय काही लाभार्थींची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उर्वरित सव्वा लाख रुपये कसे जमा करणार असा सवाल निर्माण झाला आहे. यांसह विविध मागण्यांची पूर्तता करण्यासाठी प्रभाग १८ मधील नागरिकांसह नगरसेविका सपना नवले, अनिता मिश्रा, प्रमिला गीते, नगरसेवक गजानन चव्हाण, अश्विन नवले यांनी मनपावर मोर्चा काढला. महापालिका आयुक्त अजय लहाने यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनिकर, नगरसेविका मंजूषा शेळके, नगरसेवक शशिकांत चोपडे, तरुण बगेरे, शरद तुरकर, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, प्रदीप गुरुखुद्दे, दिनेश सरोदे, योगेश गीते अविनाश मोरे आदी उपस्थित होते.
घरकुलांसाठी शिवसेनेचा मनपावर मोर्चा
By admin | Published: July 11, 2017 1:15 AM