अकोला: जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देणे तर सोडाच त्यांच्या तुरीची खरेदी करण्यास जाणीवपूर्वक आखडता हात घेऊन शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत ढकलणाऱ्या भाजपला झोपेतून जागे करण्यासाठी शिवसेनेने आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात ‘रुमणे’ मोर्चाचे आयोजन करण्यात येत असून, याची सुरुवात ५ मे रोजी बाळापूर तालुक्यातून केली जात असल्याची माहिती जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. गतवर्षी पावसाने चांगली साथ दिल्यामुळे शेतीच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. सोयाबीन, तूर, कापसाचे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला होता; परंतु ज्या पद्धतीने भाजप सरकारने तूर खरेदी करताना शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्जाचा डोंगर वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही सरकारमध्ये भाजपच्या सोबत असलो तरी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर तोडगा निघत नसेल तर आमचा सरकारच्या धोरणांना तीव्र विरोध राहणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी दिली. तूर खरेदीवरून भाजपने वेळोवेळी मारलेल्या कोलांटउड्या पाहता एकप्रकारे शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात आल्याचे दिसून येते. भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, भाजपला झोपेतून जागे करण्यासाठी येत्या ५ मे रोजी बाळापूर तालुक्यात ऐतिहासिक अशा ‘रुमणे’मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख देशमुख यांनी दिली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अकोट, मूर्तिजापूर व अकोला तालुक्यात मोर्चा काढला जाईल. मोर्चामध्ये सामील शेतकऱ्यांना शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा खासदार अरविंद सावंत संबोधित करणार आहेत. पत्रकार परिषदेला आमदार गोपीकिशन बाजोरिया, उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, निवासी उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, संतोष अनासने, तरुण बगेरे, प्रदीप गुरुखुद्दे, अश्विन नवले, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, दिनेश सरोदे, अश्विन पांडे,धनंजय गावंडे उपस्थित होते.शेतकरी अडचणीत; भाजपची चुप्पीअर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना आमदारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहाचे कामकाज २० दिवस बंद पाडल्याची आठवण करून देत आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर कडाडून हल्लाबोल केला. निसर्गाने साथ दिल्यामुळे पीक उत्पादन वाढले असले तरी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा कर्जबाजारी होण्याची वेळ आल्याचे आ. बाजोरिया यांनी सांगितले. नाफेडने तूर खरेदीची नौटंकी केली. खरा लाभ व्यापाऱ्यांना मिळाला. शेतकरी विविध समस्यांनी त्रस्त असून, त्यांची व्यथा समजून घेण्याची गरज आहे. शिवसेना शेतकऱ्यांप्रती बांधील असून, जोपर्यंत त्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत भाजप सरकारच्या धोरणांना आमचा विरोध कायम राहणार असल्याचे आ. बाजोरिया यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे या मोर्चात शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा रूमणे मोर्चा
By admin | Published: May 02, 2017 1:21 AM