लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरातील देशमुख फैल परिसरातील एकमेव छत्रपती शिवाजी महाराज पार्कची अत्यंत दुरवस्था झाली असून, पार्कमध्ये सांडपाणी अन् झुडुपांची समस्या निर्माण झाली. यासंदर्भात पार्कसमोर धरणे आंदोलन छेडणाऱ्या शिवाजी उद्यान संघर्ष समितीच्या मागण्यांची दखल घेत महापालिका प्रशासनाने सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. गुरुवारी पार्कमधील बंद पथदिव्यांच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आल्याचे दिसून आले.देशमुख फैलस्थित शिवाजी महाविद्यालयाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा असलेले शहरातील एकमेव उद्यान आजच्या घडीला शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र आहे. शिवाजी पार्कमध्ये परिसरातील सांडपाणी साचले असून, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आजवर मनपाच्यावतीने कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. पार्कच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने काटेरी झुडुपांचे पीक फोफावले आहे. या समस्येमुळे परिसरातील नागरिक, लहान मुलांना पार्कमध्ये जाणे मुश्कील झाले आहे. प्रभागातील चारही नगरसेवक भाजपचे असले तरी संबंधितांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी शिवाजी उद्यान संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. अखेर उशिरा का होईना, प्रशासनाला जाग आल्यानंतर शिवाजी पार्कमधील समस्या दूर करण्यासाठी पावले उचलण्यात आल्याचे दिसून आले.
कार्यकारी अभियंत्यांना पाठविले; पण...शहरातील मनपाच्या मालकीचे सर्व बगिचे, उद्यान यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाकडे आहे. या विभागातील प्रभारी अधिकारी व कर्मचारी प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा न करता समस्येत आणखी वाढ कशी होईल, याची तजवीज करण्यात पटाईत आहेत. शिवाजी पार्कच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आयुक्त संजय कापडणीस यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर यांना ८ नोव्हेंबर रोजी समस्या निकाली काढण्याचे फर्मान बजावले होते. त्यानुसार अजय गुजर यांनी शिवाजी पार्कची पाहणी केली; परंतु त्यावर कोणताही तोडगा न काढता परत आले, हे विशेष.शिवाजी पार्कची देखभाल करणे आमची जबाबदारी आहे. यापूर्वी अजय गुजर यांना समस्या निकाली काढण्यासाठी पाठविले होते. आता सहायक आयुक्त वैभव आवारे यांच्यावर जबाबदारी सोपविली असून, त्यांनी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. उद्यानातील समस्या निकाली काढण्यासाठी किमान आठवडाभराचा अवधी लागेल.- संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.