अकोला : जिल्ह्यातील जागृत आदर्श ग्राम शिवर येथील श्री दुर्गादेवी संस्थानचा २९ वा वर्धापनदिन उत्सव सोहळा उत्साहात पार पडला. टाळ-मृदंगाच्या गजराने व हरिनामाच्या जयघोषाने शिवर नगरी दुमदुमून गेली होती.
सप्ताहाचा समारोप तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या काल्याच्या हरिकीर्तनाने करण्यात आला. याप्रसंगी बोलताना महाराजांनी श्री दुर्गादेवी संस्थानच्या सामाजिक व धार्मिक कार्याचे कौतुक केले व संस्थानला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. शासनाने दिलेल्या कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून वर्धापनदिन उत्सव सोहळा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी काैतुक केले.
विदर्भातील पाळोदी येथील भागवताचार्य राजेंद्र महाराज वक्टे यांच्या मधुर वाणीतून ३१ डिसेंबर २०२० ते ७ जानेवारी २०२१ या कालावधीत श्रीमद्भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विदर्भातील नामवंत हरिकीर्तनकार महाराजांची समाजप्रबोधन हरिकीर्तने तसेच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी श्री दुर्गादेवी संस्थानचे अध्यक्ष जगदीश मुरूमकार यांनी संस्थानच्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. शासनाने कोरोनासंदर्भात दिलेल्या नियमावलीचे पालन करून श्री दुर्गादेवी संस्थानचा वर्धापनदिन उत्सव सोहळा पार पडला.
---------------
भागवत ग्रंथाची नगरप्रदक्षिणा
७ जानेवारीला माउली हरिपाठ मंडळ शिवर यांच्या नेतृत्वात श्रीमद्भागवत ग्रंथाची गावातून भव्य नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक चौकात आकर्षक रांगोळ्या काढून श्रीमद्भागवत ग्रंथाचे पूजन करण्यात आले. यावेळी आयोजित महाप्रसादाचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.