अकोला : गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत असून, या योजनेच्या अंमलबजावणीत पहिल्या टप्प्यात अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालय आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन ठिकाणी २६ जानेवारीपासून शिवथाळी सुरू होणार आहे. त्यानुषंगाने शिवभोजन योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी १० लाख ८० हजार रुपयांचे अनुदान २३ जानेवारी रोजी शासनामार्फत मंजूर करण्यात आले आहे.गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात २६ जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. शिवभोजन योजनेत शहरी भागात प्रति थाळी ५० रुपये आणि ग्रामीण भागात ३५ रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली असून, गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रति थाळीपोटी १० रुपयांप्रमाणे आकारणी करण्यात येणार आहे. योजनेंतर्गत ठरविण्यात आलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, भोजनालयांना प्रति ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या १० रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रकमेचे अनुदान शासनाकडून थेट जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिवथाळीचे अनुदान संबंधितांना वितरित करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने शिवभोजन योजनेंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ६ कोटी ४८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास २३ जानेवारी रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये शिवभोजन योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी १० लाख ८० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शिवभोजन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोला शहरातील सर्वोपचार रुग्णालय आणि अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन ठिकाणी २६ जानेवारीपासून शिवथाळी सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.