लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर तालुक्यातील काही शिवसैनिक रिगल टॉकीज परिसरात चहा पित असताना क्षुल्लक कारणावरून याच परिसरातील काही शिवसैनिकांनी त्यांच्याशी वाद घातला. यावरून शिवसैनिकांमध्ये आपसातच किरकोळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी घडली; मात्र हा प्रकार सिटी कोतवाली पोलिसांपर्यंत गेल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटातील शिवसैनिकांना चांगलाच दम भरला. एका गटातील शिवसैनिकांना ‘बाजीराव’ दाखविताच सदर प्रकरण आपसात मिटविण्यात आल्याची माहिती आहे.बाळापूर तालुक्यातील शिवसैनिक रिगल टॉक ीज परिसरात चहा पिण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्याशी याच परिसरातील काही युवकांनी वाद घातला; मात्र दोन्ही गट शिवसैनिकांचे असल्याने हा प्रकार मस्करीचा असल्याचे दिसून आले. सदर प्रकरण वाढत गेल्याने यामध्ये शिवसैनिक आपसातच भिडले. हे प्रकरण सिटी कोतवाली पोलिसांना माहीत पडताच पोलिसांनी दोन्ही गटातील शिवसैनिकांना ठाण्यात बसवले. सदर प्रकार निव्वळ गैरसमजातून झाल्याचे लक्षात आले. सिटी कोतवाली पोलिसांनी एका गटातील शिवसैनिकांना चांगलेच झोडपल्याची माहिती आहे. शिवसैनिकांची मोठी गर्दी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात झाल्याचे माहीत पडताच शहर व जिल्ह्यातील शिवसैनिक पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर सदर प्रकरण आपसात मिटविण्यात आले.बड्या अधिकाऱ्याचा फोनबाळापूर तालुक्यातील शिवसैनिक आणि शहरातील शिवसैनिकांमध्ये वाद झाल्यानंतर हा प्रकार मुंबईपर्यंत पोहोचला. त्यानंतर एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने फोन केला. या फोननंतर काही शिवसैनिकांना बाजीराव दाखविण्यात आला; मात्र त्यानंतर लगेच आणखी शिवसेनेचे बडे पदाधिकारी येताच हे प्रकरण मिटविण्यात आले.
शिवसैनिक आपसात भिडले!
By admin | Published: June 29, 2017 12:53 AM