- राजेश शेगोकार
अकोला: होणार, नाही होणार, अशा गोंधळात अखेर सर्व रुसवे-फुगवे विसरून भाजपा, शिवसेना युतीचे शुभमंगल झाले. सोमवारी संध्याकाळी मुंबईत युती ‘ठरल्याची’ सुपारी फुटली अन् आतापर्यंतच्या सर्व अटकळी संपुष्टात आल्या. आता महाआघाडीकडे लक्ष लागले आहे. भाजपाचा विजयी वारू रोखण्यासाठी काँग्रेसने सर्व विरोधकांची ताकद एकवटण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, या प्रयत्नांमध्ये अॅड. आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे. अकोला ही अॅड. आंबेडकरांची राजकीय राजधानी असल्यामुळे युतीच्या शुभमंगलनंतर आता अकोल्यातील राजकीय वर्तृळाचे लक्ष महाआघाडीकडे लागले आहे.महत्प्रयासाने केंद्रात व राज्यात आलेली सत्ता भाजपाला गमवायची नाही, असा चंग या पक्षाने बांधला असल्यामुळेच युतीसाठी जमिनीवर येत सेनेची मनधरणी केली. अकोला लोकसभा मतदारसंघात सेना-भाजपाचे संबंध हे हवे तेवढे मधुर नसले तरी एकदम टोकाचेही नाहीत. भाजपाने सेनेला गृहीतही न धरता आपली रणनीती यापूर्वीच तयार केलेली आहे. जिल्ह्यातील १ हजार २८८ ‘मतदान केंद्र’ मजबूत करीत निवडणुकीची तयारी सुरू केली. सोबतच विस्तारक ही संकल्पना राबविली. ‘सबका साथ, सबका’ विकास मेळावा असो की आताच झालेले आरोग्य शिबिर असो, अशा अनेक शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचा धडाका लावला आहे. पक्षपातळीवर खासदार संजय धोत्रे यांनी व त्यांच्या गटाने अतिशय सक्रिय होत संघटनेवर पकड निर्माण केली असून, धोत्रे यांना पर्याय निर्माण होणार नाही याची जाणीवपूर्वक दक्षता घेतली आहे. भाजपाच्या या तयारीत युतीमुळे सेनेच्या मतांची बेगमीच होणार आहे. आतापर्यंतच्या तीन लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतला असता भाजपाची मते ही चढत्या क्रमाने असून, गेल्या निवडणुकीत तर मोदी इफेक्टमुळे मतांचा विक्रम झाला. भाजपाची अशी दमदार स्थिती असताना शिवसेनेही स्वबळाच्या नाऱ्यामुळे संघटन बांधणीकडे लक्ष दिल्याने या ताकदीचा फायदा भाजपालाच होणार आहे. दुसरीकडे काँग्रेस व भारिप बमसंची मते विभागल्या गेल्याने भाजपाचा विजय अतिशय सुकर झाला. तीच चूक यावेळी होऊ नये म्हणून काँग्रेस समविचारी पक्षांची मोट बांधत आहे.भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे संकेत यापूर्वीच दिले होते. या आघाडीमध्ये अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंचाही सहभाग असावा, असे प्रयत्न सुरू असले तरी एमआयएम सोबतची मैत्री अन् वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा यामुळे जागा वाटपाचे घोडे अडले आहे. आता युती झाल्याने काँग्रेसवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे अॅड. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या जागांबाबत काँग्रेस गांभीर्याने विचार करून महाआघाडी होणार का, या निर्णयाकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.