अकोला: जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या गुरुवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने साथ सोडल्यावरही भारिप बहुजन महासंघाने सत्ता कायम राखली. या निवडणुकीत शिवसेना सदस्यांमध्ये फूट पडली असून, भाजप-शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष मिळून एकत्र आलेल्या महाआघाडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी भारिप-बमसंच्या संध्या वाघोडे व जमीरखा पठान यांनी प्रत्येकी २६ मते मिळवून विजय मिळविला.गत अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह दोन अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन भारिप-बमसंने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. त्यामध्ये काँग्रेसला एक सभापतीपदही देण्यात आले होते. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडणूक घेण्यात आली. त्यामध्ये भारिप-बमसंला जिल्हा परिषदेच्या सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजप, काँग्रेस व अपक्ष मिळून महाआघाडी तयार करण्यात आली. अध्यक्ष -उपाध्यक्षपदासाठी सदस्यांचे मतदान घेण्यात आले. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण ५१ सदस्यांपैकी ४९ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. एक अपक्ष सदस्य राजेश खोने अनुपस्थित होते. तर शिवसेनेचे एक सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग न घेता तटस्थ राहिले. हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी भारिप-बमसंच्या संध्या वाघोडे व जमीरखा पठान यांना प्रत्येकी २६ आणि महाआघाडीचे अपक्ष सदस्य नितीन टाले-देशमुख व भाजपसमर्थीत अपक्ष ज्योत्स्ना बहाळे यांना अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी २३ सदस्यांनी मतदान केले. २६ मते प्राप्त करून भारिपच्या संध्या वाघोडे अध्यक्षपदी व जमीरखा पठाण उपाध्यक्षपदी विजयी झाले.
शिवसनेत फूट; भारिपची सत्ता कायम!
By admin | Published: July 01, 2016 2:20 AM