अकोला: माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव गावंडे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या सर्मथकांमध्ये शुक्रवारी क्षुल्लक कारणावरून तुफान धुमश्चक्री झाली. या धुमश्चक्रीत श्रीरंग पिंजरकर यांना कोणतीही इजा झाली नसली तरी, त्यांचा मुलगा कुणाल व पुतण्या मंगेश यांना किरकोळ दुखापत झाली. यावेळी पिंजरकर यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी परस्परांविरोधात तक्रार देण्यासाठी खदान पोलीस ठाण्यात दोन्ही गट दिवसभर जमा झाले होते; मात्र नंतर प्रकरण आपसात मिटविण्यात आले. कौलखड चौकात नवरात्रीनिमित्त देवीची स्थापना करण्यात आली आहे. या देवीच्या मंडपासमोर महिलांचे पारायण असल्याने शुक्रवारी आणखी एक मंडप उभारण्यात आला. हा मंडप श्रीरंग पिंजरकर यांच्या दुकानापुढे टाकण्यात आला. त्यामुळे पिंजरकर यांचा मुलगा कुणाल, पुतण्या मंगेश व चालक देशमुख हे तिघे मंडप काढण्यासाठी गेले. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडप काढण्याची सूचना केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पारायण आटोपताच मंडप काढला जाईल, असे सांगितले. यावरून कुणाल पिंजरकर, मंगेश पिंजरकर व चालक देशमुख आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. वादाची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांना मिळताच तेही कौलखेड चौकात आले. तोपर्यंत दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाली. या मारहाणीत कुणाल पिंजरकर यांना किरकोळ दुखापत झाली असून, मंगेशलाही दुखापत झाली. पिंजरकर यांच्या एमएच ३0 - ९00९ क्रमांकाच्या वाहनाच्या काचाही या फोडण्यात आल्या. शिवसेनेतील स्थानिक नेत्यांनी हा वाद आपसात करण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आल्याने प्रकरणावर तात्पुरता पडदा पडला; मात्र शिवसेनेच्या या दोन्ही गटातील वाद जुने आणि सर्वश्रुत असून, भविष्यात हे प्रकरण कोणते वळण घेते, यावर पक्षात चर्चा रंगली आहे.
शिवेसेना नेते गावंडे- जिल्हाप्रमुख पिंजरकर सर्मथकांमध्ये धुमश्चक्री
By admin | Published: October 17, 2015 1:59 AM