नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी हालचालीआशिष गावंडे - अकोलाआगामी लोकसभा, जिल्हा परिषद तसेच विधानसभा निवडणुका ध्यानात घेऊन शिवसेनेच्या महिला संघटनेत फेरबदलाचे वारे सुरू झाले आहेत. महिला संघटनेची दयनीय स्थिती पाहता नवीन कार्यकारिणी गठित करण्यासाठी पक्षात हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. राज्यात पार पडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची मोठ्या फरकाने पीछेहाट झाल्याचे दिसून आले. दहा महापालिकांपैकी सेनेला केवळ मुंबई आणि ठाणे मनपात सत्ता राखता आली. अकोला मनपात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले, तर गतवेळच्या आठ जागा स्वबळावर कायम ठेवण्यात शिवसेनेला समाधान मानावे लागले. भाजपने आगामी लोकसभा, जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी सुरू केली असून, लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय बुथ प्रमुखांच्या नियुक्तीचा सपाटा लावला आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीत बदल केल्यानंतर शिवसैनिक कामाला लागले असले, तरी महिला संघटनेची मात्र पुरती दाणादाण उडाल्याचे दिसून येते. जिल्ह्यासह शहरात महिलांची मजबूत फळी उभारण्यात महिला संघटना सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. आजरोजी महिला संघटन केवळ कागदावर असल्यामुळे आगामी निवडणुकांना कसे सामोरे जायचे, यावर पक्षात खलबते सुरू झाली आहेत. मागील अनेक वर्षांपासून महिला संघटनेची पुनर्बांधणी न झाल्यामुळे प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा उराशी बाळगणाऱ्या महिला कार्यकर्त्या पक्षापासून दुरावल्याचे दिसून येते. प्रतिस्पर्धी भाजपच्या तुलनेत सेनेच्या महिला संघटनेचा कोठेही ठावठिकाणा नसल्याची परिस्थिती आहे. निवडणुकीच्या काळात चुलीपर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाकडे महिला कार्यकर्त्या नसल्यामुळे पक्षाच्या नेत्यांची कोंडी झाली आहे. अशास्थितीत महिला संघटनेत फेरबदल करण्यावाचून पक्षासमोर पर्याय नसल्याने नवीन कार्यकारिणी गठण करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याची माहिती आहे.मजबूत बांधणी आहे कोठे? अकोट तालुका व शहर वगळता जिल्ह्यात इतर तालुक्यांमध्ये महिला संघटना आहे कोठे, असे विचारण्याची वेळ आली आहे. पदांवर ठाण मांडून बसणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांनी पक्ष वाढीला तिलांजली दिल्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ आल्याचे पक्षात बोलल्या जात आहे.संघटनेत जबाबदारीसाठी ‘लॉबिंग’ सुरूशिवसेनेतील काही मंत्र्यांची पक्षातील विद्यमान महिला पदाधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी असल्याचे बोलल्या जाते. ही बाब हेरून स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी पक्षाकडे ‘लॉबिंग’ सुरू केली आहे. या व्यतिरिक्त माया म्हैसने, देवश्री ठाकरे, सुनीता मेटांगे, वनिता पागृत, शुभांगी किनगे यांची नावे चर्चेत आहेत.