- आशिष गावंडे
अकोला : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली जात आहे. पक्षाकडून विदर्भातील लोकसभेच्या दहा जागांसाठी चाचपणी सुरू असून, संभाव्य उमेदवारांच्या नावावर सेनेच्या संपर्क प्रमुखांसोबत चर्चा करण्यात येत असल्याची माहिती आहे.हिंदुत्वाच्या मुद्यावर नैसर्गिक मित्र, अशी ओळख असणाºया शिवसेना-भाजपमध्ये २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरून बिनसले होते. त्यावेळी जागा वाटपाच्या बैठकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीवर भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनी बोचरी टिपणी केल्याची सल आजही शिवसैनिकांच्या मनात कायम असल्याचे बोलल्या जाते. आज रोजी राज्यात शिवसेना-भाजपची युती असली तरी शेतकºयांच्या मुद्यावर भाजपने घेतलेल्या प्रत्येक निर्णयांवर शिवसेनेचा प्रखर विरोध पाहता प्रत्यक्षात विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा दावा करणारी काँग्रेस-राष्ट्रवादीसुद्धा निष्प्रभ ठरल्याचे चित्र मागील चार वर्षांमध्ये पहावयास मिळाले आहे. सत्तेत असूनही सेना-भाजपमधील दरी कमी होण्याऐवजी अधिकच रूंदावली असल्याचे समोर आले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची केवळ औपचारिक घोषणा न करता पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पुढाकार घेऊन राज्यभरात बैठका व जाहीर सभांचा धडाका लावल्यामुळे शिवसेनेच्या पुढील वाटचालीचा अंदाज एव्हाना सर्वच राजकीय पक्षांना आला आहे. कधीकाळी विदर्भात शिवसेनेची मजबूत तटबंदी होती. कोकण, मराठवाडा व त्यानंतर विदर्भाने शिवसेनेला साथ दिली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती होती. यंदा शिवसेनेने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून, विदर्भातील लोकसभेच्या दहा जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात केल्याची माहिती आहे.सहा जागांवर उमेदवार देण्याचे आव्हानलोकसभेच्या विदर्भातील दहा मतदारसंघांपैकी आजवर शिवसेनेने बुलडाणा, यवतमाळ-वाशिम, अमरावती व रामटेक अशा एकूण चार मतदार संघात भगवा फडकवला आहे. उर्वरित अकोला, नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया या सहा मतदार संघात तगडा उमेदवार देण्याचे शिवसेनेसमोर आव्हान असल्याचे चित्र आहे.
४८ मतदार संघात जाहीर सभाराज्यातील ४८ लोकसभा मतदार संघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभा घेण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे. महाराष्ट्र दौऱ्याची पहिली सभा त्यांची शिर्डी येथे पार पडली. सभांचे नियोजन करण्यासाठी शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.