अकोला : शेगाव येथून अकोल्याकडे येत असलेली भरधाव शिवशाहीने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवार (२५ जुलै) रोजी दुपारी १ वाजताचे सुमारास रिधोरा नजीक घडली. चालकाने प्रसंगावधान दाखविल्याने बसमधील ४४ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली.
अकोला क्र. २ आगारातीच एमएच ०९ इएम १७९२ क्रमांकाची शिवशाही बस सकाळी अकोला येथून शेगावकडे गेली होती. विनावाहक असलेली शिवशाही बस चालक पी. एन. डोंगरे शेगाव येथून परत घेऊन येत असताना रिधाेरानजीकच्या हॉटेल तुषार समोर आली असता तांत्रिक कारणामुळे चालकाच्या कॅबीनमध्ये अचानक आग लागली.
आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबविली व सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. पाहता पाहता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.