अकोला : मागील काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाची प्रवासी सेवाही सुरळीत सुरू झाली आहे; परंतु आरामदायक प्रवासासाठी ओळख असलेल्या शिवशाही बसला प्रवासी मिळत नसल्याचे दिसून येत असून, बस उभी ठेवण्याची वेळ येत असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली. कोरोनामुळे एसटी महामंडळाचे मोठे नुकसान झाले. कोट्यवधींचा तोटा महामंडळाला सहन करावा लागला आहे. आता एसटीची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. सध्या आगार क्रमांक २ मधून ७ शिवशाही बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत; मात्र या बसेसना प्रतिसाद नसल्याने अडचणी येत आहेत.
जिल्ह्यातील एकूण आगार - ५
एकूण शिवशाही - ८
सध्या सुरू असलेल्या शिवशाही - ७
या मार्गावर सुरू आहेत शिवशाही
अकोला-नागपूर
अकोला-नाशिक
अकोला-अमरावती
अकोला-औरंगाबाद
बसेसचे दररोज सॅनिटायझेशन
कोरोना कमी झाला आहे; परंतु संपलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनाही महत्त्वाच्या आहेत. सध्या शिवशाही बसेसमध्ये नियमित सॅनिटाईज करण्यात येत आहे.
शिवशाही बस आगारात आल्यानंतर एअरप्रेशरने संपूर्ण बस निर्जंतूक केली जात आहे. बसेसमध्ये एसी सुरू राहत असल्याने या ठिकाणी विशेष काळजी घेण्यात येत आहे.
जिल्ह्यातून सर्वाधिक शिवशाही बसेस या नागपूर आणि अमरावतीसाठी सोडण्यात येत आहेत. या मार्गावरील प्रवाशांचा प्रतिसादही चांगला मिळत आहे.
आठ शिवशाही, पण...
येथील आगार क्रमांक २ मध्ये ८ शिवशाही बसेस उपलब्ध आहेत. यातील २ नागपूर, २ अमरावती, १ औरंगाबाद व १ नाशिक येथे सोडण्यात येते; परंतु नाशिक बसला प्रतिसाद मिळत नसल्याने या मार्गावर साधी बस सोडण्यात येत आहे. तसेच प्रतिसाद नसल्याने एक बस आगारात उभी आहे.