कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटी महामंडळाची प्रवासी सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. लांब पल्ल्यांच्या बसेसही सुरू झाल्या असून बसेसना प्रतिसादही वाढला आहे; मात्र उद्योग-व्यवसायानिमित्त पुणे व मुंबई या ठिकाणी जाणारे नागरिक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देत असल्यामुळे याचा महामंडळाच्या सेवेवर व खासगी ट्रॅव्हल्सवर मोठा परिणाम झाला आहे. महामंडळाच्या पुणे व मुंबई मार्गावर कमी प्रवाशांवर बसेस जात आहेत. दुसरीकडे ट्रॅव्हल्सलाही प्रवाशांचा संमिश्र प्रतिसाद दिसून येत आहे.
एसटीच्या सुरू असलेल्या शिवशाही
अकोला-अमरावती
अकोला-नागपूर
अकोला-खामगाव
अकोला-शिरूर
एसटीकडे नाशिक मार्गावर सेमी स्लीपर रातराणी
महामंडळातर्फे सध्या नागपूर-नाशिक व पुणे मार्गावर रातराणी बस सुरू आहे. यात नाशिक मार्गावर सेमी स्लीपर बस ठेवण्यात आली आहे.
या बसमध्ये काही आसने झोपण्याची व उर्वरित आसने ही बसण्याची आहेत. या बसेसना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
एसटी व ट्रॅव्हल्सचे तिकीट सारखेच
एसटी महामंडळाच्या बसएवढेच खासगी ट्रॅव्हल्सला तिकीटदर आहे. यामध्ये महामंडळाच्या अकोला ते पुणे बसचा तिकीटदर ८९३ रुपये आहे, तर ट्रॅव्हल्सचा तिकीटदर ८५० रुपयांपर्यंत असल्याचे ट्रॅव्हल्स संचालकाने सांगितले. त्यामुळे या बसेसला सारखाच प्रतिसाद मिळत आहे.
प्रवासी म्हणतात...
एसटी बसपेक्षा ट्रॅव्हल्सला तिकीट जास्तच असते. कारण, बसमध्ये पुरेशी स्वच्छता नसते आणि वातानुकूलित सुविधाही नसते. त्यामुळे दोन पैसे जास्त गेले तर चालतील; मात्र नेहमी लांबच्या प्रवासाला जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सनेच जात असतो.
- आकाश भागवत, प्रवासी
महामंडळाच्या पुणे व नाशिक मार्गावर स्लीपर बस असल्या, तरी त्यामध्ये ना इंटरनेटची सुविधा, ना एअर कंडिशन हवा असते. त्यामुळे रात्री या गाड्यांतून प्रवास करणे म्हणजे खूप कंटाळा वाटतो; परंतु सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसेसना प्राधान्य देतो.
- विवेक मानकर, प्रवासी