- सागर कुटे
अकोला : शेगावचे संत गजानन महाराज संस्थान हे शिस्तबद्ध सेवा कार्यासाठी प्रख्यात आहे. या संस्थानच्या व्यवस्थापनावर शिवशंकरभाऊ पाटील यांच्या पारदर्शी कारभाराची छाप आहे. संस्थानमध्ये गेल्यानंतर येथील व्यवस्थापन भुरळ पाडते. मात्र, जेव्हा संस्थानमधून निघणारी पालखी गावोगावी जाते, त्या पालखीतील शिस्तबद्धता सेवाभाव आणि व्यवस्थापन हे अनेकांना अचंबित करते. अकोलेकरही याला अपवाद नाही. श्री संत गजानन महाराजांची पालखी शेकडो वारकऱ्यांसह पंढरीला मार्गस्थ होताना पालखीचा मुक्काम हा भौरदनंतर अकोला शहरात होतो आणि पुढचे दोन दिवस जणू काही अकोल्यात शेगाव अवतरल्याचे चित्र दिसून येते. पालखीच्या स्वागतासाठी अकोल्यात होणाऱ्या उपक्रमांना आपसूकच शेगावच्या शिस्त आणि सेवेची किनार लाभते. जणू काही यामधून शिवशंकरभाऊंच्या व्यवस्थापनाचा अनुभवच अकोलेकर घेत असतात.
शिवशंकरभाऊंची मुलगी अकोल्यात
शिवशंकरभाऊ पाटील यांचे अकोल्याशीही ऋणानुबंध जुळलेले आहेत. शिवशंकरभाऊंची मुलगी विजया पाटील या पळसो येथील भीसुमराव धोत्रे यांच्या घरी सून दिली आहे. सुनील धोत्रे यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर शिवशंकरभाऊंचे अकोल्यासोबत एक दृढ व भावनिक नाते जुळलेले आहे.
या ठिकाणी असतो पालखीचा मुक्काम
पंढरपूरला जाताना ‘श्रीं’ची पालखी अकोला शहरात दोन दिवस मुक्कामी राहते. यामध्ये मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात व जुन्या शहरातील छत्रपती शिवाजी टाऊन विद्यालयाच्या प्रांगणात मुक्कामी असते.
‘श्रीं’च्या पालखीसाठी अकोलेकरांचा सेवाभाव
‘श्रीं’ची पालखी शहरात दाखल होताच दर्शनासाठी शहर आणि परिसरातील भाविकांनी एकच गर्दी केली होती. भर पावसातही भाविकांमध्ये ‘श्रीं’च्या दर्शनाची ओढ असते. याचवेळी अकोलेकरांचा सेवाभाव दिसून येतो. शहरात ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासह सामाजिक संस्था, धार्मिक संस्था, राजकीय पदाधिकारी आणि सेवाभावी भाविक वारकऱ्यांची चहा, नाश्ता वाटप, तसेच विविध प्रकारांतून सेवा करताना दिसून येतात.
शहरात उत्सवाचे स्वरूप
श्री संत गजानन महाराजांची पालखी शहरातील विविध मार्गांनी मार्गस्थ होत असताना शहरात उत्सवाचे स्वरूप निर्माण होते. ‘श्रीं’च्या प्रती असलेला भक्तिभावही दिसून येतो. यावेळी भजन, कीर्तन असे विविध कार्यक्रम पार पडतात.
मंदिर बंद तरीही वारी सुरूच!
कोरोनामुळे शेगाव येथील ‘श्रीं’चे मंदिर बंद आहे. या काळातही श्रद्धेपोटी शेकडो अकोलेकर शेगावची पायी वारी करताना दिसून येतात. समाधीचे दर्शन होत नसले तरी मंदिराच्या गेटपासून कळस दर्शन करून अकोलेकर आपली वारी पूर्ण करीत आहेत.