अकोले : येथे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि माजी सहकारमंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची गळाभेट झाल्याने इंदापूर तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
रविवारी अकोले (ता. इंदापूर) येथे खासदार संजय राऊत एका खासगी कार्यक्रमानिमित्त आले होते. या निमित्ताने पाटील आणि राऊत या दोघांच्या गळाभेटीने तालुक्यातील राजकीय चित्र बदलणार की काय, अशी चर्चा रंगली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये जाऊन त्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.
यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर आता ही गळाभेट घेतल्याने राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे. या भेटीवर हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्टीकरण देत या भेटीमध्ये कोणताही राजकीय उद्देश नसून तालुक्यात आलेल्या पाहुण्यांची गळाभेट घेऊन स्वागत करणे ही परंपरा असल्याचे पाटील यांनी नमूद केले.
....तर लॉकडाऊन लावावा लागेल
याबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्यात कोरोना रोगाचे संकट वाढत असून याला अटकाव करण्याची जबाबदारी सरकारबरोबर सर्व नागरिकांची पण आहे. यात राजकारण करून काही उपयोग होणार नाही. रुग्णांची संख्या जर वेगाने वाढली, तर प्रशासनाला पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असे संकेत राऊत यांनी यावेळी दिले.