अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेचे भयावह स्वरूप मे महिन्यात आणखी घातक झाले असून, पहिल्या दहा दिवसांतच १२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कमी दिवसांत सर्वाधिक मृत्यू झाल्याचा हा प्रकार गत वर्षभरात पहिल्यांदाच घडला आहे. कोविडचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा वेग पाहता अकोलेकरांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती अत्यंत गंभीर झाल्याचे चित्र एप्रिल महिन्याच्या आकडेवारीतून समोर आले होते. एप्रिल महिन्यात कोरोनाचे २२५ बळी, तर १२ हजार १२४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, मात्र मे महिन्यात कोविड संसर्गाचा वेग आणखी जलद झाला असून, मागील दहा दिवसांत तब्बल १२८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पहिल्यांदाच अशी स्थिती पाहावयास मिळाली, मात्र तरीदेखील अकोलेकरांना याचे गांभीर्य दिसत नसल्याची स्थिती आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला; मात्र फेब्रुवारी महिन्यापासून सक्रिय झालेल्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शेकडोंनी वाढत आहे. एप्रिल महिन्यातील स्थिती पाहता प्रतिदिवस सरासरी ३७० पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. दरम्यान, सद्यस्थितीत जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांत खाटांची कमतरता भासत असून खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचीही टंचाई दिसून येत आहे. कोविड फैलावाची स्थिती अशीच कायम राहिल्यास खाटा, ऑक्सिजन आणि इतर साधनसामग्रीची टंचाई भासून परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दहा दिवसांत ६,११६ बाधित
मृतांच्या आकड्याप्रमाणेच कोविड बाधितांचा आकडादेखील थक्क करणारा आहे. मे महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच ६ हजार ११६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आतापर्यंतची ही सर्वात गंभीर स्थिती आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून संसर्गाचा हा सर्वाधिक वेग असल्याचे आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.
मागील दहा दिवसांतील स्थिती
तारीख - रुग्ण - डिस्चार्ज - मृत्यू
१ मे - ५६३ - ४७० - १३
२ मे - ५९९ - ४४६ - ११
३ मे - ३८७ - ४३८ - १८
४ मे - ७१८ - ४७५ - ६
५ मे - ६९४ - ४०६ - ६
६ मे - ६८० - ४५९ - ११
७ मे - ७१४ - ४८८ - ११
८ मे - ५२३ - ५५० - २२
९ मे - ७६२ - ५३९ - १२
१० मे - ४७६ - ५७५ - १८
असा आहे कोरोनाचा आलेख
महिना- रुग्ण - मृत्यू
एप्रिल - २८ - ०३
मे - ५५३ - २९
जून - ९६९ - ४७
जुलै - १०८७ - ३४
ऑगस्ट - १४०० - ४७
सप्टेंबर - ३४६८ - ८४
ऑक्टोबर - ८९३ - ४५
नोव्हेंबर - १०३३ - १२
डिसेंबर - १०५८ - २९
जानेवारी - ११३५ - १४
फेब्रुवारी - ४५२७ - ३१
मार्च - ११५५५ - ८६
एप्रिल - १२,१२४ - २२५
मे - ६,११६ - १२८ (१० मेपर्यंत)