- प्रवीण खेतेअकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून, कोरोनाबाधितांचा आकडा ५८१ वर पोहोचला आहे. गत ३१ दिवसांत कोरोनाने तब्बल २८ जणांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे, यातील १९ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. आतापर्यंत एकूण ३२ जणांचा बळी गेला आहे.जिल्ह्याचा ‘रेड झोन’मध्ये प्रवेश झाल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. शिवाय, मृत्यूदरही वाढला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी १४ एप्रिल रोजी गेला होता. तत्पूर्वी ११ एप्रिल रोजी ३१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने सर्वोपचार रुग्णालयात आत्महत्या केली होती. ३० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे केवळ चार बळी गेले होते; मात्र मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी कोरोनाने आणखी एक बळी घेतला. मृत्यूचे हे सत्र मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरूच राहिले. धक्कादायक बाब म्हणजे, मे महिन्यात दर दिवसाआड एकाचा बळी गेला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. १ ते ३१ मे या कालावधीत तब्बल २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यातील १९ रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. ही चिंतेची बाब असून, वयोवृद्धांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.मृतांमध्येमहिला - १५पुरुष - १७
मृतकांना होते हे आजारकोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण हे ४० ते ८० वयोगटातील आहेत. यातील बहुतांश रुग्णांना उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह यासह निमोनिया आदी आजारांच्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्वच वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली आहे. मृतकांमध्ये ५० पेक्षा जास्त वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त असून, त्यांना इतरही आजारांच्या समस्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी कुटुंबातील वयोवृद्ध सदस्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.