-संजय उमकअकोला - एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीत धडे घेणाऱ्या बालकांना कालबाह्य पोषण आहाचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात असे प्रकार वारंवार घडत असल्याने हा चिंतेचा विषय झाला आहे.
ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक बालक सुदृढ व सक्षम व्हावा आणि त्याचे आरोग्य सुधारावे, यासाठी शासन अंगणवाडीच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात खर्च करते; पण मूर्तिजापूर तालुक्यातील परिस्थिती काही वेगळेच सांगून जाते. सक्षम व सुदृढ बनवणारी यंत्रणाच आता झाल्या प्रकारावरुन लक्षात येते. राज्य भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत मूर्तिजापूर येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात येते परंतु मूर्तिजापूर शहरातील वसंत नगर स्थित अंगणवाडी क्रमांक ६ मधिल बालकांना मुदत बाह्य पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. सीलबंद पाकीटात असलेल्या पोषण आहाराचे वितरण बालकांना करण्यात आले आहे. सदर पाकिटावर पॅकेजिंग तारीख ९ सप्टेंबर २०२१ असून पॅक केल्याच्या तारखेपासून ४ चार महीने पर्यंत वापरण्याची सुचना ठळक व स्पष्ट लिहिलेली असताना देखील या अंगणवाडीतून २४ मार्च रोजी मुदत संपलेल्या पोषण आहाराचे वितरण करण्यात आल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सविश रविंद्र गवई यांनी चौकशी करुन कारवाई करण्यासाठी महिला व बालविकास आयुक्त व एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. वितरीत करण्यात आलेला आहारचे अनेक बालकांनी सेवन केले आहे. केवळ काही जागृक पालकांच्या घडलेला प्रकार लक्षात आला, ज्या बालकांनी आहाराचे सेवन केले अशा बालकांच्या प्रकृतीचे काय असाही प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील १९० अंगणवाड्या आहेत परंतु हा प्रकल्प चालविण्यासाठी कर्मचारी संख्या अत्यंत तोकडी आहे. या कार्यालयाला एकूण १० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; मात्र १० कर्मचाऱ्यांचा भार केवळ ४ ते ५ कर्मचारी सांभाळत आहेत. अतिरिक्त भार सांभाळताना अशा अनेक अक्षम्य चुका होत आहेत. मुदत बाह्य पोषण आहाराचे आहाराचे वाटप करण्यात आले आहे, हे खरे आहे, सदर प्रकार अंगणवाडी सेविकेच्या चुकीने घडला. वितरीत करण्यात आलेल्या आहाराचे पॅकेट्स परत मागविण्यात आले आहे. - पी. के. राठोड, बालविकास प्रकल्प अधिकारी, मूर्तिजापूर