अकोला: मागील तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांमध्ये तरुणांसह बालकांचे प्रमाणही लक्षणीय असून मागील सहा महिन्यात सुमारे ६०० पेक्षा जास्त बालकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वच बालकं ० ते १२ वर्षे वयोगटातील असल्याने पालकांनी चिमुकल्यांची विशेष निगा राखण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच ० ते १२ वयोगटातील चिमुकल्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पालकांची चिंता वाढविणारा ठरत आहे. मागील सहा महिन्यात सुमारे ६०० पेक्षा जास्त बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षभरात सुमारे एक हजारावर बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षभराच्या तुलनेत मागील सहा महिन्यातील आकडा जास्त असून बालकांमध्ये कोविडच्या संसर्गाचा धोका कायम आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता पालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे.
पालकांनी घ्यावी काळजी
लहान बालकांना विलगीकरणात ठेवणे शक्य नाही. त्यामुळे लहान बालकं कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात, मात्र पालकांनी योग्य ती काळजी घेतल्यास बालकांपासून इतरांना कोरोनाची लागण होणार नाही. त्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करावा. तसेच शक्य असल्यास मोठ्या बालकांनाही मास्क घालणे, नियमित हात धुणे तसेच इतरांपासून सुरक्षित अंतर राखण्याबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
मागील सहा महिन्यात सुमारे ६०० बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. बालकांची राेगप्रतिकारशक्ती चांंगली असल्याने कोरोनाचा जास्त प्रभाव त्यांच्यावर पडत नसला तरी पालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
- डॉ. विनीत वरठे, बालरोग तज्ज्ञ, जीएमसी, अकोला