अकोला : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या कालावधीत गरीब रेशन कार्डधारकांना महाराष्ट्र दिनापासून (१ मे) मोफत धान्याचे वाटप सुरू होणार आहे. त्यामध्ये कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून ‘ई पाॅस’मशीनवर रेशन कार्डधारकांऐवजी रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लागणार असल्याचे निर्देश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत शुक्रवारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे मोफत धान्यासाठी रेशन कार्डधारकांना ‘ई पाॅस’ मशीनवर अंगठा लावण्याची गरज राहणार नाही.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, कडक निर्बंधांच्या कालावधीत गरीब रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा शासनामार्फत करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत गरीब रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण १ मेपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ तसेच अंत्योदय अन्न योजनेंतर्गत रेशन कार्डधारकांना प्रति कुटुंब २० किलो गहू व १५ किलो तांदूळ आणि प्राधान्य गट व अंत्योदय योजनेतील रेशन कार्डधारकांना प्रति कार्ड एक किलो प्रमाणे हरभरा किंवा तूर यापैकी एका डाळ असे मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा कहर लक्षात घेता, मोफत धान्य वाटप करताना कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘ई पाॅस’ मशीनवर रेशन कार्डधारकांऐवजी रास्तभाव दुकानदारांचा अंगठा लावून मोफत धान्य वाटप करण्याचे निर्देश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाला ३० एप्रिल रोजी प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील १२ लाख ७६ हजार रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप करताना ‘ई पाॅस’ मशीनवर रेशन कार्डधारकांना अंगठा लावण्याची गरज राहणार नसून, ‘ई पाॅस’ मशीनवर संबंधित रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लावून मोफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील लाभार्थी रेशन कार्डधारक
बीपीएल : ७०,९३९
अंत्योदय : ४४,८४७
केशरी : १,०६,८१७
जिल्ह्यात १ मेपासून प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेतील रेशन कार्डधारकांना रास्तभाव धान्य दुकानांमधून मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी धान्य वाटप करताना ‘ई पाॅस’ मशीनवर रेशन कार्डधारकांऐवजी रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लावून लाभार्थी रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप करण्याचे निर्देश शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून शुक्रवारी प्राप्त झाले. त्यानुसार ‘ई पाॅस ’मशीनवर रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लावून रेशन कार्डधारकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात येणार आहे.
-बी. यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी