अकोला : ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू होणार असून, त्यानुसार रात्री १० वाजेपर्यंत दुकाने, मॉल, उपहारगृहे सुरू ठेवता येणार आहेत. निर्बंध बऱ्याचअंशी शिथिल होत असल्याने अर्थचक्राला आणखी गती मिळण्याचा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविला जात आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कठोर निर्बंध लागू असल्याने उद्योगचक्र जवळपास ठप्पच होते. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सराफा, वाहन, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फर्निचर यासह अन्य व्यवसायांना जबर फटका बसला. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. सध्या रात्री आठ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा आहे.
कोरोना नियंत्रणात असल्याने राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून निर्बंध आणखी शिथिल करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार जिल्ह्यातील दुकाने, मॉल, उपाहारगृहे १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहणार आहे.
त्यामुळे उद्योग जगताला उभारी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून, अर्थचक्राला आणखी गती मिळेल, असा अंदाज व्यापाऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, खबरदारीचा प्रयत्न म्हणून सर्व दुकाने, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल व्यवस्थापनाला सर्व कामगारांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती ठेवावी लागणार आहे.
लग्नसमारंभावरील उपस्थिती मर्यादेत सूट!
खुल्या प्रांगणातील /लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालयातील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येणार आहे.
तसेच खुल्या प्रांगण, लॉनमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के; परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत राहील. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादेत राहील.