रिॲलीटी चेक
रवी दामोदर
अकोला: कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या चित्रपटगृहांवरील निर्बंध हटले असून, अनलॉक प्रक्रियेत चित्रपटगृह पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. राज्यात ५० टक्केच प्रक्षेकांच्या उपस्थितीत चित्रपटगृहे सुरू आहेत. मात्र नवीन चित्रपट नसल्याने चित्रपटगृहात प्रेक्षकच नसल्याचे सोमवारी दिसून आले. तसेच कोरोनाच्या धास्तीमुळे चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे चित्रपटगृहचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अनलॉक प्रक्रियेत चित्रपटगृहांमध्ये कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत अटी व शर्थीच्या आधारे चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. मात्र नवीन चित्रपट प्रदर्शित नसल्याने प्रेक्षक येत नसल्याचे दिसून येत आहे. चित्रपटगृहात जे चित्रपट सुरू आहेत ते चित्रपट पाहण्यासाठी केवळ ५ ते १० टक्केच प्रेक्षक येत आहेत. चित्रपटगृहात २९० हून अधिक प्रेक्षकांची सोय असलेल्या चित्रपटगृहात आता फक्त १० ते १५ प्रेक्षकच चित्रपट पाहण्यासाठी येत आहे. (फोटो)
------------------------------------------
मोठे चित्रपट प्रदर्शित नसल्याने प्रेक्षक नाहीत!
सिंगल पडदा असलेल्या चित्रपटगृहांना कोरोनाचा सार्वाधिक फटका सहन करावा लागला. शहरात चार सिंगल पडदा व एक मल्टीप्लेक्स चित्रपटगृह आहेत. यापैकी तीन सिंगल स्क्रीन असलेले चित्रपटगृह बंद अवस्थेत आहेत. जोपर्यंत मोठे चित्रपट प्रदर्शित होत नाहीत, तोपर्यंत चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक येणार नसल्याचे चित्रपटगृहांच्या व्यवस्थापकाने सांगितले. मोठ्या अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित झाले, तर चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक पुन्हा परत येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
----------------------------------------
नवीन चित्रपट प्रदर्शित होत नसल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात येत नाहीत. चित्रपटगृहात कोरोनाविषयक नियमांचे पालन केल्या जात आहे.
श्याम पडगीलवार, व्यवस्थापक, वसंत चित्रपटगृह.
----------------------------------------------
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट प्रदर्शित झाल्याने ते घरीच बसून पाहिले; मात्र चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याची मजा वेगळीच आहे. आम्ही मोठे चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहोत.
- निलेश बनसोड, प्रेक्षक, अकोला.
------------------------------------
कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे चित्रपटगृहात कुटुंबासह चित्रपट पाहायला जाण्यासाठी भीती वाटते. मोठे स्टारचे चित्रपटही प्रदर्शित झाले नाही, त्यामुळे चित्रपटगृहात गर्दी कमी आहे.
- अभिषेक जाधव, प्रेक्षक, अकोला.