कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील इतर लसीकरण केंद्रात नागरिकांचे लसीकरण सुरू होते; मात्र लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरण ठप्प पडल्याची माहिती आहे.
-----------------------------
अकोटात दुय्यम निबंधक कार्यालयात ‘नो एन्ट्री’
अकोटः कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शासकीय कार्यालय दक्ष झाली आहेत. येथील तालुका स्तरावरील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता व इतर कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या पक्षकारांची संख्या वाढत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीकरिता व इतर कार्यालयीन कामाकरिता येणाऱ्या पक्षकार यांच्याकडे कोविड चाचणीचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे अनिवार्य करण्यात आला आहे. निगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास त्यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन चाचणी करण्याची सूचना केली आहे. निगेटिव्ह रिपोर्ट दाखविल्यानंतरच कार्यालयात प्रवेश देणार असल्याची सूचना कार्यालयात लावण्यात आली आहे.
.........................
‘नरसिंहानंद सरस्वतींवर कारवाई करा!’
अकोट: मोहम्मद पैगंबरांविषयी अपशब्द वापरणाऱ्या दीपक त्यागी ऊर्फ यति नरसिंहानंद सरस्वती (दासनासेवी मंदिर, गजियाबाद) यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ठाणेदार ज्ञानोबा फड यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर ॲड. अब्दुल जुनेद अब्दुल मुकीद (अकोलखेड), कारी मोहम्मद रफिक, तथा अकोलखेड येथील समाजबांधवांच्या सह्या आहेत.
.....................
कुटासा येथे १०८ जणांना लस
अकोटः प्राथमिक आरोग्य केंद्र कावसाअंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत कुटासा येथे ४५ वयोगटातील नागरिकांना लसीकरण संपन्न झाले. यावेळी गावातील १०८ नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र कावसा वैद्यकीय अधिकारी डॉ. डाबेराव, चौधरी, वावरे, आशा सेविका मेहरे, गावंडे आदी उपस्थित होते.