अकोला : सर्वोपचार रुग्णालयात नेत्र रुग्णांसाठी लेन्स आणि आवश्यक औषधांचा साठा नसल्याने अनेक नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक लागला आहे. डॉक्टर व आवश्यक साहित्य असूनही लेन्स व औषधांअभावी रुग्णांना शस्त्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागत आहे.राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत अंधत्व निवारणासाठी विविध उपक्रम राबविले जातात. यातील ज्या रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते, अशा रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येतात; परंतु मागील सहा महिन्यांपासून या ठिकाणी नेत्र रुग्णांसाठी आवश्यक औषधच उपलब्ध नसल्याने अनेक नेत्र शस्त्रक्रियांना ब्रेक लागल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. त्याचा थेट परिणाम राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमावर दिसून येत आहे. एरवी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने शस्त्रक्रिया थांबविल्या जातात; परंतु येथे डॉक्टर आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणं असूनही औषधांअभावी शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. परिणामी, नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जावे लागत असून, त्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. अंधत्व निवारणासाठी प्रशासनाची गांभीर्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.दिवसाला ४० शस्त्रक्रिया व्हायच्यापाच ते सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतर्गत दिवसाला जवळपास ४० नेत्र शस्त्रक्रिया व्हायच्या. त्यामुळे कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंधत्व निवारण वेगाने होऊ लागले होते; परंतु औषधांच्या अभावामुळे दररोज जेमतेम आठ ते दहा शस्त्रक्रिया होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अडचण आल्यास अनेकदा शस्त्रक्रियाच होत नसल्याचाही प्रकार घडत असल्याची माहिती आहे. अशा वेळी नेत्र रुग्णांना पुढची तारीख देऊन वेळ निभावल्या जाते.शस्त्रक्रियांचा घटता आलेखजिल्हा सर्वोपचार रुग्णालयांतर्गत मागील काही वर्षांपासून शस्त्रक्रियेचा आलेख घसरत आहे. मागील पाच वर्षांच्या कालावधीत हा परिणाम जाणवू लागला आहे. कधीकाळी दिवसाकाठी ५० ते ६० शस्त्रक्रिया व्हायच्या, त्या ४० वर आल्यात. आता तर या शस्त्रक्रियेचे प्रमाण आठ ते दहावर आले आहे.या औषधांचा तुटवडासर्वोपचार रुग्णालयात आयड्रॉप तसेच नेत्र बधिरीकरण औषधांचा तुटवडा आहे. शिवाय लेन्सही नसल्याने अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत.
नेत्रबधिरीकरणाच्या औषधांची मागणी केली आहे. लवकरच त्याचा पुरवठा होणार आहे. नेत्र शस्त्रक्रिया सुरू असून, इतर समस्या नाही.- डॉ. मधुकर राठोड, आरएमओ, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय.