अनंत वानखडे
बाळापूर : महाबीज सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवत असून, बॅग कमी व ग्राहक अधिक असे चित्र आहे. सकाळपासूनच कृषी केंद्रांसमोर महाबीज सोयाबीन बियाणे मिळविण्यासाठी शेतकऱ्याच्या रांगा लागलेल्या असतात. इतर सोयाबीन बियाण्याच्या कंपन्याच्या भावाच्या तुलनेत महाबीज सोयाबीन बियाण्याचे दर हजार ते बाराशे रुपये प्रतिबॅगवर कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल महाबीज बियाण्यांकडे अधिक दिसून येत आहे.
महाबीज कंपनीकडून कृषी केंद्रधारकांना बियाण्यांचा पुरवठा कमी झाल्याने जागा कमी व ग्राहक जास्त अशी स्थिती झाली आहे. कृषी केंद्रांवर महाबीज सोयाबीन बियाण्यांच्या बॅग उपलब्ध झाल्याचे कळताच शेतकरी सकाळपासूनच कृषी केंद्रासमोर बियाणे मिळवण्यासाठी रांगेत उभे राहत असल्याचे तालुक्यात दिसून येत आहे. काही तासांतच त्या बियाण्याचा साठा संपल्याने कित्येक शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. महाबीज सोयाबीनची प्रतिबॅग २२५० रुपये असून, इतर कंपनीचे बियाणे ३००० ते ३६०० रुपये प्रतिबॅग इतकी तफावत आहे. पेरणीचा हंगाम तोंडावर आला शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे कमी दरात उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
--------------------------
दरवर्षी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात असतो, महाबीजचे बियाणे मिळाले नसल्याने ३२०० प्रतिबॅग दराने इतर कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी करावे लागले. महाबीजचे बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
- हरीश हिवराळे, शेतकरी, मांडवा खु.
-----------------------------
कृषी विभागाचा अलर्ट
कृषी विभागाने यंदा सोयाबीन बियाण्यांची टंचाई भासणार असल्याने घरचे सोयाबीन राखून ठेवण्याचा सल्ला दिला होता.