अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाच्या संशयित रुग्णांना हाताळणाऱ्या डॉक्टरांना पुरेसे पर्सनल प्रोटेक्टीव्ह इक्विपमेंट ‘पीपीई’ किट नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत आहे. शिवाय, मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरचाही तुटवडा असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. अशातच येथे येणाºया रुग्णांची बेफिकिरी इतर रुग्णांसह डॉक्टरांसाठीही घातक ठरू शकते.कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने काही पावले उचलली आहेत; मात्र वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरविण्यात आलेली सुरक्षा साधने अपुरी ठरत आहेत. सध्यातरी ‘एचआयव्ही’ किटवर गरज भागविली जात आहे. अत्यावश्यक वेळीच ‘पीपीई’ किटचा वापर होत असल्याची माहिती आहे. एकीकडे डॉक्टरांकडून सुरक्षा साधनांचा काटकसरीने वापर केला जात आहे, तर दुसरीकडे सर्वोपचार रुग्णालयात येणाºया रुग्णांची बेफिकिरी घातक ठरत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसला तरी, संशयितांचा आकडा वाढला आहे. अशा परिस्थितीतही प्रशासनाकडून डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तीन हजार ‘पीपीई’ किटची केली होती मागणीडॉक्टरांच्या सुरक्षेसाठी ३ हजार ‘पीपीई’ किटची पंधरा दिवसांपूर्वी मागणी करण्यात आली होती. या सर्व किट इंदूरहून येणार होत्या; परंतु अद्यापही या किट उपलब्ध झाल्या नाहीत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. पर्याय व्यवस्था म्हणून नागपूर आणि चंद्रपूर येथून २०० किट बोलाविण्यात आल्या होत्या; परंतु सध्याची परिस्थिती पाहता या किट मर्यादित आहेत.
इतर वॉर्डात डॉक्टरांना सुरक्षाच नाही!सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना वॉर्डात कार्यरत डॉक्टरांसह इतर वैद्यकीय कर्मचाºयांना काही प्रमाणात सुरक्षा पुरविण्यात आली आहे; मात्र इतर वॉर्डात विशेषत: अपघात कक्षात कार्यरत डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाºयांना आवश्यक सुरक्षा साधनांचा पुरवठा करण्यात आला नाही. कोरोनाचे अनेक संशयित रुग्ण प्राथमिक उपचारासाठी अपघात कक्षातही येत असल्याने या ठिकाणी संक्रमणाचा सर्वाधिक धोका आहे.