अकोला: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सुरू करण्यात आलेली मोफत बूस्टर लसीकरण मोहीम ३० सप्टेंबरनंतर बंद होणार आहे. या विशेष मोहिमेचे अवघे चार दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोविशिल्डला पर्याय म्हणून कॉर्बिव्हॅक्स लसीचा उपयोग केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कोविडची स्थिती नियंत्रणात असल्याने त्याचा परिणाम लसीकरण मोहिमेवरही दिसून येत आहे. गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोविड लसीकरणाचाही वेग मंदावला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये खासगी लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीचा बुस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, ही मोहीम ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेचे केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत; मात्र अद्यापही अनेकांनी लसीचा बुस्टर डोस घेतला नाही.
अशातच राज्यस्तरावरून कोविशिल्डचा पुरवठा न झाल्याने जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही स्थिती पाहता मोहिमेंतर्गत आता कोविशिल्डला पर्याय म्हणून कॉरबीव्हॅक्स लसीचा वापर केला जाऊ लागला आहे. या लसीच्या वापरासंदर्भात केंद्रीय आरोग्य यंत्रणेमार्फत ८ ऑगस्ट रोजी सूचना दिल्या होत्या.त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी आरोग्य सेवा अतिरीक्त संचालक यांनी प्रिकॉशन डोससाठी कॉरबीव्हॅक्स लसीच्या वापरासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, कॉरबीव्हॅक्स लस प्रिकॉशन डोस म्हणून वापरता येईल.
दुसरा डोस घेणाऱ्यांना पंचाईत
ज्यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशांना लसीच्या दुसऱ्या डोससाठी लसच उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे. काही केंद्रांवर लस आहे, तर काही केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने दुसऱ्या डोससाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्ह्यातील लसीचा साठालस - उपलब्ध डोसकोविशिल्ड - १५००कॉर्बिव्हॅक्स - १९०००कोव्हॅक्सिन - १२०००