अकोला : कोरोनावर प्रभावी उपचारासाठी रेमडेसीवीर संजीवनी ठरत आहे. त्यामुळे कोरोना काळापासूनच या इंजेक्शनची मागणी वाढली. इंजेक्शनचा काळा बाजार होऊ नये, म्हणून शासनातर्फे काही नियम लावण्यात आले आहेत, मात्र हेच नियम आता जटिल ठरत आहेत. सद्य:स्थितीत पश्चिम वऱ्हाडात रेमडेसीवीरचा तुटवडा जाणवत असून, बुलडाण्यात या इंजेक्शनचा स्टॉकच उपलब्ध नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील रुग्णाला रेमडेसीवीरची गरज भासल्यास त्याला जटिल नियमांमुळे शेजारील जिल्ह्यातून रेमडेसीवीर उपलब्ध होणे शक्य नाही. आपत्कालीन परिस्थितीतही, असे जटिल नियम रुग्णांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. रेमडेसीवीरचा काळा बाजार होऊ नये, म्हणून इंजेक्शन घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ऑनलाइन नोंदणी केली जाते. तसेच रुग्णावर ज्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत, त्याच जिल्ह्यातून त्याला रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध होऊ शकते. शेजारील जिल्ह्यात रेमडेसीवीरचा साठा उपलब्ध असला, तरी त्या ठिकाणाहून रुग्णाला रेमडेसीवीर खरेदी करणे शक्य नाही. सध्या पश्चिम वऱ्हाडात रेमडेसीवीरचा तुटवडा जाणवत असल्याने हे जटिल नियम कोविडच्या गंभीर रुग्णांसाठी जीवघेणे ठरत आहेत. सद्य:स्थितीत अकोल्यात खासगी बाजारपेठेत रेमडेसीवीर मुबलक प्रमाणात उपलब्ध असले, तरी शासकीय यंत्रणेकडे मर्यादित साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात ही स्थिती गंभीर आहे. बुलडाणा जिल्ह्यात खासगी रुग्णालयात दाखल रुग्णाला रेमडेसीवीरची आवश्यकता भासल्यास, ते स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक पर्यायी व्यवस्था म्हणून शेजारच्या जिल्ह्यांचा आधार घेतात, मात्र जिल्ह्याबाहेरील रुग्णाला रेमडेसीवीर इंजेक्शन देणे शक्य नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शेजारील जिल्ह्यात रेमडेसीवीर उपलब्ध असूनही ते दुसऱ्या जिल्ह्यातील रुग्णाला देणे शक्य नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत हा जटिल नियम कोविड रुग्णांसाठी जीवघेण ठरत आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने या नियमांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे रुग्ण नातेवाइकांचे म्हणणे आहे.
अकोल्यासाठी नागपूर येथून मागविला रेमडेसीवीर
जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढली असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेमडेसीवीरची मागणीही वाढली असून, दोन दिवसांपूर्वी शासकीय यंत्रणेकडे रेमडेसीवीर उपलब्धच नव्हते. ही स्थिती पाहता अकोल्यासाठी नागपूर येथून रेमडेसीवीरचा साठा मागविण्यात आल्याची माहिती आहे.
वऱ्हाडातील शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसीवीरचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये रेमडेसीवीरचा मुबलक साठा उपलब्ध राहावा, यासाठी आरोग्य विभागाकडून आवश्यक ती काळजी घेती जात आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला