अकाेलेकरांच्या बेफिकिरीमुळे काेराेनाच्या प्रादूर्भावात झपाट्याने वाढ झाल्यामुळे जिल्हाप्रशासनाने २३ फेब्रुवारी पासून जिल्ह्यासह शहरात लाॅकडाऊनचा निर्णय घेतला. व्यापार ठप्प हाेण्याच्या धास्तीने व्यापाऱ्यांनी दुकाने खुली करण्याची परवानगी मागितली असता जिल्हाप्रशासनाने काेविड चाचणी बंधनकारक केली. अर्थात व्यापारी व कामगारांची संख्या लक्षात घेता चाचणीसाठी जिल्हा व महापालिका प्रशासनाने चाचणी केंद्रांची संख्या वाढवून टेस्टिंग किट उपलब्ध करून देणे अपेक्षित हाेते. तसे न करता व्यावसायिकांवर कारवाइचा बडगा उगारला.
अवघ्या तीन तासांत गाशा गुंडाळला!
व्यापारी व कामगारांना काेविड चाचणी बंधनकारक केल्यामुळे चाचणी केंद्रांसमाेर शुक्रवारी व शनिवारी व्यापाऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या. शनिवारी मनपाच्या चाचणी केंद्रांवर टेस्टिंग किट संपल्याने अवघ्या तीन तासांत गाशा गुंडाळल्याचे समाेर आले. अनेक चाचणी केंद्रांवर किमान १०० व त्यापेक्षा अधिक किट उपलब्ध असताना त्याठिकाणी किमान ७०० ते ८०० व्यापाऱी व कामगारांनी गर्दी केल्याचे चित्र हाेते. गीता नगरमध्ये भर उन्हात व्यापारी,कामगार तासन् तास ताटकळत उभे हाेते.
नागरिक संतापले; अधिकाऱ्यांशी वाद
भाजपचे नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी पुढाकार घेऊन जवाहर नगर चाैकात चाचणी केंद्र सुरु केले. मनपाच्या वैद्यकीय पथकाकडे ५०० टेस्टिंग किट हाेत्या. परंतु पीपीइ किट घातलेल्या महिला कर्मचाऱ्याला उन्हाचा त्रास हाेऊ लागल्याने २०० नागरिकांची चाचणी केली. त्यामुळे रांगेतील नागरिकांनी नगरसेवकासह मनपा अधिकाऱ्यांसाेबत वाद घातला. जुने शहरातील कस्तुरबा रुग्णालयातही किट संपल्याने संतप्त नागरिकांनी आराेग्य कमर्चाऱ्यांसाेबत वाद घातला.
प्रशासनाच्या दिव्याखाली अंधार
जिल्हा व मनपा प्रशासनाने सुरु केलेल्या चाचणी केंद्रांवर स्वॅब घेण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव हाेता. संगणकात नाेंदणी करण्यासाठी नागरी आराेग्य केंद्रांकडून मनपाला डाटा एन्ट्री ऑपरेटरची मागणी केली जात असताना मनपाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रॅपिड अन्टिजेन टेस्ट केल्यानंतर अनेकांना अहवाल प्राप्त हाेत नसल्याची परिस्थिती आहे. अशास्थितीत व्यापाऱ्यांवर दबावतंत्र कशासाठी,असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यंत्रणांची उडाली धांदल
जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी डाॅ.निलेश अपार, मनपातर्फे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यासंपूर्ण कामकाजावर लक्ष ठेवून आहेत. परंतु प्रत्यक्षात चाचणी केंद्र सुरू केल्यानंतर या दाेन्ही यंत्रणांची धांदल उडाल्याची परिस्थिती असून यामध्ये नाहक व्यापारी वर्ग भरडल्या जात असल्याचे चित्र समाेर आले आहे.