अकोला : पाकिस्तान हा देश सद्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्या देशाची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासोबतच केंद्रातील सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचाही विचार करावा, असा सल्ला भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी येथे दिला. त्याचवेळी सर्जिकल स्ट्राईक करण्याआधी आंतरराष्ट्रीय परिणामांचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.शिवजयंती निमित्त भारीप-बमसंच्यावतीने अकोला येथे काढण्यात आलेल्या रॅलीला झेंडी देण्यासाठी आलेल्या अॅड. आंबेडकरांनी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पृष्ठभूमीवर भाष्य करताना अॅड. आंबेडकर म्हणाले, की भारतासह अमेरिकेने आर्थिक नाड्या आवळल्यामुळे पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या स्थितीत येऊन पोहचला आहे. पाकिस्तानला या दिवाळखोरीतून सावरण्याची संधी मिळू नये, यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. सौदी अरेबियाने पाकिस्तानला दिलेली २० मिलियन डॉलरची आर्थिक मदत रोखण्यासाठी भारताने प्रयत्न करावयास हवे होते. अमेरिकेने पाकची आर्थिक मदत रोखलीच आहे. इतर देशांनीही पाकला मदत करू नये यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले पाहिजे, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.आर्थिक कोंडी करणे हा पाकविरोधातील सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगतानाच त्या देशाला जरब बसावी यासाठी सरकारने सर्जिकल स्ट्राईचाही विचार करावा. पुलवामा दहशतवादी हल्ला हा सिमेपलीकडून नव्हे तर भारताच्या भूमितच झालेला असल्यामुळे सर्जिकल स्ट्राईक करण्याआधी भारताने त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय होतील, याचा सारासार विचारही करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आंबेडकर यांनी केले. पंतप्रधांनानी दहतवादी हल्ल्यासंदर्भातील माहिती मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसोबत ‘शेअर ’ केली पाहिजे, असे आपले मत असल्याचेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकचा विचार करावा - अॅड. प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 3:12 PM