अकोला : कोरोनामुळे दुसऱ्यांदा मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. आता निर्बंध शिथिल झाली असून, सर्वच व्यवसाय सुरू झाले आहेत; मात्र जिल्ह्यातील मंदिरे अद्यापही बंद आहेत. त्यामुळे मंदिर सुरू करण्यात यावी अशी मागणी जाेर धरत आहे. भारतीय जनता पक्षाने मंदिरे सुरू करण्यासाठी आक्रमक भूमिका घेऊन राज्यभर शंखनाद आंदाेलनही केले त्यामुळे या मुद्याला राजकीय वळण मिळू लागले आहे. या पृष्ठभूमीवर सर्व राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेतली असता मंदिरे सुरू करण्याबाबत एकमत दिसून आले नाही.
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वृद्धीदर कमी आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. वेळेचे बंधनही कमी करण्यात आले आहे. असे असले तरी अद्याप भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे बंद आहेत. मंदिरांमध्येही गर्दी टाळण्यासाठी त्या संदर्भात स्वतंत्र आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे आपल्या आराध्यदैवताचे दर्शन करण्यासाठी भाविक मंदिरात जातात; परंतु मंदिर बंद असल्याने गेटजवळ नतमस्तक होऊन परत जातात. यामुळे मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. त्यांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
काेराेना परतल्यावर मंदिर उघडावीत शिवसेना
मंदिर उघडण्याची मागणी सामान्य लाेकांची नाही. केवळ राजकीय हेतूने मागणी केली जाते. काेराेनाचा उद्रेक लक्षात घेता सरकारने नियमावली केली आहे. त्यानुसार मंदिरेही उघडली जातील. आपली सर्वांची श्रद्धा घरातील मंदिरांवरच आहे. काेराेनाचे संकट परतले की मंदिरेही उघडतील यात शंकाच नाही.
आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख, शिवसेना
सर्वच सुरू, मग मंदिरे बंद का?- भाजप
काेराेनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्यातील सर्वच निर्बंध उठविले आहेत, केवळ शाळा व मंदिरे बंद आहेत. आता सण, उत्सव सुरू आहेत. अशा प्रसंगी किमान काेराेनाचे नियम पाळून मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिली पाहिजे, हवे तर काेराेनाेच्या उद्रेकानुसार वर्गवारी करून मंदिरे उघडण्याबाबत नियमावली करावी.
आ. रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष भाजप
याेग्य वेळी मंदिरांबाबतही निर्णय- काॅंग्रेस
मंदिरे उघडलीच पाहिजेत यात दुमत नाही मात्र काेराेनाचे संकट संपले नाही, डेल्टासारखे आजार डाेके वर काढत आहेत. अशा स्थितीत निर्बंध उठविण्याचा प्रत्येक निर्णय हा संभाव्य धाेका ओळखून घेतला जाताे. आघाडी सरकार याबाबत निश्चित विचार करून याेग्यवेळी निर्णय घेईल, अशी खात्री आहे.
अशाेक अमानकर, जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस
काेराेनाचा धाेका ओळखून निर्णय व्हावा
मंदिरे ही आपले श्रद्धास्थान आहेत, त्यामुळे आता सर्वच खुले हाेत असताना मंदिरेही खुली व्हावीत असे वाटणे स्वाभाविक आहे. मुख्यमंत्री व आराेग्यमंत्री राज्याच्या काेराेना टास्क फाेर्ससाेबत चर्चा करून याेग्य वेळी निर्बंध शिथिल करण्याची भूमिका घेताना दिसले आहेत त्यामुळे मंदिरांबाबतही याेग्य परिस्थितीचा अंदाज घेतला जाईल असे वाटते.
संग्राम गावंडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस
प्रसंगी आंदाेलनाची भूमिका घेऊ-वंचित
राज्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती आता नियंत्रणात आहे. त्यामुळे पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तसेच राज्यातील इतर मंदिरे व प्रार्थना स्थळे सुरू करण्यात यावीत, अशी मागणी आम्ही या आधीच केली आहे. ती कायमच असून प्रसंगी गेल्यावेळी केलेल्या आंदाेलनाप्रमाणे भूमिका घेणार आहाेत.
डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी