अकोला : कोरोनाच्या प्रादूर्भावाच्या पृष्ठभूमीवर देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान मार्च ते मे महिन्यात महावितरणकडून मिटर रिडींग बंद होते. जूनमध्ये लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर एकदम मार्च ते जून महिन्याचे सरासरी वीज बिल देण्यात आले. एकत्रित आलेल्या वीजबिलाचा आकडा अधिक असल्यामुळे अवास्तव विजबिल आकरण्यात आल्याची नागरिकांमध्ये निर्माण झालेली भावना चुकीची असून, स्लॅब बेनिफिट व योग्य दरानुसारच वीजबील देण्यात आल्याचे महावितरणच्याअकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी ‘लोकमत’सोबत साधलेल्या संवादातून स्पष्ट केले आहे.प्रश्न - महावितरणचे विविध चार्जेस कोणते आहेत?उत्तर : - महावितरणच्या वीजबिलात आकारण्यात आलेले सर्व आकार हे वीजबिलाचाच भाग आहे. महावितरणचे वीजबिल समजायला थोडे किचकट जरी वाटत असले तरी ते अत्यंत पारदर्शक आहे. ग्राहकांना दिलेल्या वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार, विद्युत समायोजन कर आणि वीज शुल्काचा समावेश असतो.प्रश्न - या विविध अकारांचे विश्लेषण सांगता येईल का ?उत्तर : स्थिर आकार : प्रत्येक ग्राहक वर्गवारीनुसार तसेच सदर वीजपुरवठ्याच्या जोडभारानुसार किंवा अधिकतम मागणीनुसार, लघु, उच्च व अतिउच्च दाब ग्राहक वर्गवारीनुसार कंपनीने प्रस्तावित केलेल्या व महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे मंजुरीनुसार प्रत्येक वीजग्राहकासाठी दरमहाची स्थिर अशी किमान आकारणी वीज देयकात (बिलात) केली जाते, त्यास स्थिर आकार म्हणतात. वीज आकार : वापरलेल्या प्रत्यक्ष युनिटला लावलेला आकार म्हणजे वीज आकार. हा आकार स्लॅब नुसार आणि प्रती युनिटप्रमाणे लावण्यात येतो. १ एप्रिल २०२० पासून या आकारात किंचीतशी वाढ झाली आहे. वहन आकार : वीज तयार झाल्यानंतर पारेषण प्रणाली मार्फत वितरण प्रणाली पर्यंत वीज वाहून आणण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या खर्चाला वीज वहन आकार असे म्हणतात. इंधन समायोजन आकार : विद्युत निर्मितीसाठी लागणाºया इंधनाच्या किमतीतील चढउतारातील फरकाची जी निर्धारित आकारणी असते त्यास इंधन समायोजन आकार म्हणतात. वीज शुल्क : प्रत्येक ग्राहकाला देण्यात येणाºया देयकातील (बिलातील) स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार आणि इंधन समायोजन आकार (अ+ब+क+ड) यांच्या बेरजेवर ग्राहक वर्गवारीनुसार निर्धारित केलेल्या दराने आकारण्यात येणाºया शुल्कास वीज शुल्क असे म्हणतात.प्रश्न - लॉकडाऊन काळात विजबिल कसे आकारण्यात आले ?उत्तर :लॉकडाऊन काळा ज्या ग्राहकांनी आपले मीटर रिडीग पाठविले नाही त्यांचे रीडिंग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना मागील तीन महिन्याच्या म्हणजे माहे जानेवारी,फेब्रुवारी आणि मार्च च्या बिलानुसार सरासरी प्रमाणे एसएमएस व्दारे वीजबिल पाठविण्यात आले. डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्यात हिवाळा असल्यामुळे साहजिकच या काळात विजेचा वापर कमी होता आणि त्यानुसार ग्राहकांना आलेले सरासरी वीजबिल हे निश्चितच कमी होते. परंतू जुन मध्ये प्रत्यक्ष मीटर वाचन करण्यात आल्यानंतर ग्राहकांना ३ महिन्याचे एकत्रित वीजबिल पाठविण्यात आले.पण मधल्या काळात काही ग्राहकांनी त्यांना आलेले सरासरी वीज देयक भरले होते.असे असले तरी स्थीर आकार वगळता ग्राहकांनी भरलेली वीज देयके वजा सरासरी देयके या मथळ्याखाली जुन/जुलै च्या वीज बिलातून वजा करण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांना मागील तीन महिन्यात वापरलेल्या युनिटचे वीज बिल जास्त जरी आलेले वाटत असले तरी ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या युनिटला प्रत्येक महिन्यात विभागून स्लॅब नुसार बेनिफीट देण्यात आलेला आहे.प्रश्न - स्लॅब बेनिफिट न देता सरसकट बिल आकारल्याची चर्चा आहे, त्या विषयी काय सांगाल?उत्तर : सोशल मिडियावर ही अफवा पसरली आहे. परंतु, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. महावितरण ही कंपनी महाराष्ट्र शासनाची सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय कंपनी आहे. त्यामुळे या कंपनीचा नफा मिळविणे हा उद्देश असू शकत नाही. याशिवाय सर्व वीज कंपन्या या वीज नियामक आयोगाच्या नियंत्रणाखाली काम करतात. त्यामुळे वीज दर व इतर कोणतेही अतिरिक्त आकार ठरविण्याचा महावितरणला किंवा कोणत्याही वीज कंपनीला अधिकार नाही. जाहीर जनसुनावणी घेऊन वीज नियामक आयोग वीज दर निश्चित करीत असते. महावितरणला आयोगाने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच वीज बिलांची वसूली करावी लागते. ग्राहक स्वत: त्यांच्या विजबिलाची पडताळणी महावितरणच्या संकेतस्थळावर जाऊन करू शकतात. त्यासाठी https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंक वर जाऊन वीज ग्राहक त्यांचे वीज बिल तपासून पाहू शकतात.
अवास्तव वीज बिलाबाबतची ओरड चुकीची - पवनकुमार कछोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 5:29 PM