अकोला : जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत ग्रामपंचायतींच्या कामकाजात अनियमितता आढळून आल्याने, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) साैरभ कटियार यांनी पातूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या नऊ ग्रामसेवकांना ९ डिसेंबर रोजी कारणे दाखवा (शो...काॅज) नोटीस बजावली.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने गत ऑक्टोबरमध्ये पातूर तालुक्यातील आलेगाव, कारला, झरंडी व विवरा इत्यादी चार ग्रामपंचायतींच्या कामकाजाची तपासणी करुन, अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. विशेष पथकाने सादर केलेल्या तपासणी अहवालात २०१६-१७ ते २०१९-२० या कालावधीत पातूर तालुक्यातील संबंधित चार ग्रामपंचायतींच्या कामकाजात आणि निधी खर्चात अनियमितता आढळून आली आहे. त्यामुळे पातूर तालुक्यातील आलेगाव, कारला, झरंडी व विवरा या चार ग्रामपंचायतींच्या संबंधित नऊ ग्रामसेवकांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी कारणे नोटीस बजावली आहे.
सात दिवसांत मागितले स्पष्टीकरण !
नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या कालावधीत संबंधित ग्रामसेवकांनी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये दिला आहे.