अकोला : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुधारणा कार्यक्रमांतर्गत तपासणी करण्यासाठी माहिती न दिल्याने जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आलेगाव, कावसा, पळसो बढे येथील वैद्यकीय अधिकाºयांना सात दिवसांत खुलासा देण्याचेही त्यांनी म्हटले आहे.मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या पथकाकडून ११ ते १८ आॅक्टोबर दरम्यान ३० प्राथमिक आरोग्य केंद्रांची धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये ग्रामस्थांना आरोग्य सोयी-सुविधांच्या दर्जापासून ते प्रशासकीय कामकाज, निवासस्थान, इमारती, मूलभूत सोयी, रुग्णसेवा, दर्जा, विविध संदर्भसेवा, औषधोपचार, तत्काळ उपचार, रुग्ण वाहतुकीची सोय, अधिकारी-कर्मचाºयांच्या सेवा, सेवेतील त्रुटींसह १०७ मुद्यांची तपासणी पथकांनी केली. या तपासणी दरम्यान तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील माहितीच तयार नव्हती. त्यामध्ये पातूर तालुक्यातील आलेगाव, अकोट तालुक्यातील कावसा, अकोला तालुक्यातील पळसो बढे प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. तपासणीच्या वेळी वैद्यकीय अधिकाºयांना कोणतीही माहिती सांगता आली नाही. आरोग्य यंत्रणेचे अभिलेखे उपलब्ध नव्हते. तसेच केंद्रात सुधारणा करण्यासाठी कोणतीही चर्चा तपासणी पथकाला करता आली नाही. पूर्वसूचना दिल्यानंतरही संबंधित माहिती तयार न ठेवणे, यासाठी तीनही वैद्यकीय अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्याचा खुलासा तालुका आरोग्य अधिकाºयांच्या अभिप्रायासह सात दिवसांत सादर करण्याचेही बजावले. विशेष म्हणजे, तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांना डिसेंबरमध्ये भेट दिली जाईल, असेही बजावण्यात आले.
आरोग्य सेविकेच्या उत्कृष्ट कामाची दखलतपासणी दरम्यान दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका के. टी. कासोटे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत तसे अभिनंदनाचे पत्रही त्यांना पाठविण्यात आले. गत सहा महिन्यांत १७ प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात केल्याने त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली.
दोन आरोग्य केंद्रांची इमारत शिकस्ततपासणीमध्ये जामठी व आपातापा केंद्राची जुनी इमारत पाडण्यात यावी, तसेच कुरणखेड प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा, असा आदेश बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आला.
आरोग्य केंद्राची सतत तपासणीप्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा कायम राहण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील जिल्हा आरोग्य अधिकाºयांसह तालुका आरोग्य अधिकाºयांनी महिन्यात सात केंद्रांना भेटी द्याव्या, त्याचा अहवाल तसेच भेटीमध्ये आढळलेल्या बाबी शेरेबुकात नोंदविण्याचाही आदेश देण्यात आला आहे.