अकोटः तालुक्यासह शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास धुव्वाधार जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. अकोट शहरातील पोलीस स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. तसेच सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते.
शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने नाले तुंबून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. घरातील साहित्यांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. शहरातील सोनू चौकासह रस्त्यांवर व इतर सखल भागात पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरूच होता. शहरातील नाल्यांची योग्य प्रकारे सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, स्वच्छता करणे गरजेचे आहे, मात्र शहरातील अनेक प्रभागातील नालेसफाई न केल्याने शहरातील सोनू चौकासह रस्त्यांवर पाणी साचले होते.
----------------------
जिल्ह्यातही मुसळधार बरसला
जिल्ह्यात बुधवारी रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी तालुक्यांसह वणीरंभापूर, करुम, माना, हातरून, बोरगाव वैराळे, हिवरखेड, अडगाव खुर्द, अडगाव बु., बोर्डी, पणज परिसरात जोरदार पाऊस झाला.