मूर्तिजापूर: मूर्तिजापूर आणि दर्यापूर तालुक्यातील गणेश मूर्तींसाठी लाखपुरी येथील विसर्जन घाट सज्ज करण्यात आला होता. तीन दिवस चालणाऱ्या या विसर्जन सोहळ्यात दोन्ही तालुक्यांतील ७० सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मूर्तिजापूर व दर्यापूर तालुक्यातील सार्वजनिक तसेच घरगुती गणेश विसर्जन शनिवार ते सोमवार या तीन दिवसांत लाखपुरी टाकळी पूर्णाघाटावर करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंद पांडव, दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्राम यांनी कोरोना निर्बंधामुळे लाखपुरी येथील श्री लक्षेक्ष्वर संस्थान, ग्रामपंचायत लाखपुरी, ग्रामपंचायत टाकळी यांच्या सहकार्याने विविध उपाययोजना करुन गणेश विसर्जन सोहळा शिस्तबद्ध व शांततेत पार पाडला. तीन दिवसीय विसर्जन सोहळ्यात दर्यापूर व मूर्तिजापूर तालुक्यातील ७० सार्वजनिक तर घरगुती २ हजार गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. श्री लक्षेक्ष्वर संस्थानतर्फे विसर्जन घाटावर बचाव पथक, आपत्कालीन पथक, तैनात करण्यात आले होते. पिण्याचे पाणी, लाईट व्यवस्था, स्वागत कमान, प्राथमिक उपचार इत्यादी व्यवस्था करण्यात आल्या होत्या.