अकोला:संपूर्ण माहाराष्ट्रातचं नव्हे तर सातासमुद्रापार ज्यांच्या कवीता आणि गझला जावुन पोहोचल्या असे आपल्या अकोल्यातील जेष्ठ साहित्यीक, कवी, गझलकार डॅा. श्रीकृष्ण राऊत यांना पी. आर. पोटे अभियांत्रीकी महाविद्यालयात एका दिमाखदार सोहळ्यात साहित्यव्रती पुरस्कार २०१९ प्रदान करण्यात आला. या प्रसंगी मातोश्री सूर्यकांतादेवी रामचंद्र पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावतीचे अध्यक्ष रामचंद्र पोटे, उपाध्यक्ष दिलीप निंभोरकर,डॉ.केशव तुपे लेखिका, संपादक अरुणा सबाणे, डॉ. शोभा रोकडे, डॉ. कुमार बोबडे, उषा राऊत आणि तनया राऊत प्रामुख्याने उपस्थीत होते.संपूर्ण साहित्य क्षेत्रात सन्मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती द्वारा राज्यस्तरीय मराठी उत्कृष्ठ वाङ्मयनिर्मीतीसाठी दिला जातो. सदर पुरस्काराचे स्वरुप ५००० रु. रोख, शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. या पुरस्काराचे परिक्षण अमरावती मधील समीक्षक, कवी, कथाकार यांनी केले असुन त्यामध्ये डाॅ अशोक पळवेकर, डाॅ अंबादास घुले, प्रा. कल्पनाताई देशमुख, डाॅ माधुरी भटकर, डाॅ सुनंदा गडकर, सौ आशा फुसे, श्रीमती पुष्पाताई साखरे यांनी केले. गेल्या ४ दशकांपासून ही जास्त कालावधी डाॅ श्रीकृष्ण राऊत यांनी साहित्यीक, कवी, गझलकार म्हणुन आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रसिध्द आहेत. अनेक नामवंत पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत. अमरावती व नागपूर विद्यापीठाच्या अभ्सासक्रमात त्यांच्या कविता अभ्यासायला आहेत. अनेक मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती निर्मित,राजदत्त दिग्दर्शित डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जीवन-कार्यावर आधारित 'ज्ञानगंगेचा भगीरथ' हया चित्रपटाकरिता पटकथा,संवाद,गीत लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या गुलाल आणि इतर गझला या गझलसंग्रहाची दुसरी आवृत्ती नुकताचं प्रकाशित झाली आहे. दिव्यांग बांधवांकरीता ‘चार ओळी तुझ्यासाठी’ ब्रेल लिपीत प्रकाशित आहे. या पुरस्कारामुळे त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.संपूर्ण साहीत्य क्षेत्रातुन त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.अशा व्यक्तीचा सन्मान ही आपल्या अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे असे गौरवोद्गार डाॅ एम आर इंगळे यांनी त्यांचे अभिनंदन करतांना व्यक्त केले.
श्रीकृष्ण राऊत यांना साहित्यव्रती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:48 PM