अकोला: विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धा-२०१९ चा समारोप शनिवारी झाला. यंदाच्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ‘ती एकाकी का?’ या नाटकाने पटकावले. श्री समर्थ पब्लिक स्कूलने सादर केलेल्या या नाटकामध्ये स्त्री भ्रूणहत्येवर प्रकाश टाकला होता. द्वितीय पारितोषिक ज्युबिली इंग्लिश स्कूलच्या ‘सच्चा मित्र’ने मिळविले. तृतीय पारितोषिक हिंदू ज्ञानपीठ कॉन्व्हेंटने सादर केलेल्या ‘मरखना बैल’ या बालनाट्याने पटकावले.बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजक प्रा. मधू जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर उपस्थित होते. यावेळी स्पर्धा निमंत्रक प्रशांत गावंडे, परीक्षक गिरीश फडके, धनंजय सरदेशपांडे, यतीन माझीरे, प्रदीप खाडे, शर्मिला गुंजाळ व अनिल कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी लोणकर यांनी आपल्या भाषणात जीवनात यशस्वी होण्यासाठी निकोप स्पर्धेची गरज असून, विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन ती ज्ािंकण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. प्रत्येकाने आयुष्यात एक कला जोपासायलाच पाहिजे, असेदेखील लोणकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. इंद्रायणी गतिमंद शाळेच्या ‘प्रामाणिक लाकुडतोड्या’ व बालविकास विशेष शाळेच्या ‘पाणी बचाओ-जीवन बचाओ’ या नाटकांना विशेष पुरस्कार देण्यात आले. माँ शारदा ज्ञानपीठच्या ‘स्काउट गाइड मे हंगामा’आणि सेंट पॉल स्कूलच्या ‘पिरीआॅडिक टेबल आॅफ केमिकल इलिमेंटस’ या नाटकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक ‘ती एकाकी का?’करिता अनुप बहाड यांना द्वितीय सच्चा मित्रकरिता अनिता कुळकर्णी यांना देण्यात आले. उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक मुलांमध्ये विजय बोधानी याला मरखान बैलमधील सुशीलच्या भूमिकेकरिता, द्वितीय अर्णव नवरखेडे जिव्हारमधील गोलूच्या भूमिकेकरिता, तृतीय कौस्तुभ उमाळे याला रक्षामधील अमोलच्या भूमिकेकरिता याला देण्यात आले.मुलींमध्ये संस्कृती सानप हिने ‘ती एकाकी का?’मधील परीच्या पात्रासाठी, मरखाना बैलमधील मंजूच्या भूमिकेकरिता कृतिका टोपरे आणि चमचम चमकोमधील ईशाच्या पात्राकरिता मधुरा कुळकर्णी हिला तृतीय पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट वेशभूषेकरिता विशाखा वाहुरवाघ, आरती कोल्हे यांना पारितोषिक देण्यात आले. उत्कृष्ट संगीत पुरस्कार अनिकेत अकोटकर, विनय नेवे यांनी पटकावले. प्रकाश योजनेकरिता अनुप बहाड आणि तेजस्विनी खुमकर यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट नेपथ्यासाठी प्रथम पुरस्कार नीतेश नागापुरे यांना प्रदान करण्यात आला.