अकोला : प्रभु श्रीराम जन्माच्या सोहळ््यासाठी संपूर्ण अकोला नगरी सज्ज झाली असून शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नवमी शोभायात्रा समितीने जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी उभारलेले मनमोहक धार्मिक देखावे अकोलेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.संपूर्ण देशवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या प्रभू श्रीराम जन्माचा उद्या रविवारी मोठ्या उत्साहात सोहळा पार पडणार आहे. शहरातील मोठ्या राम मंदिरात श्रीराम नवमीनिमीत्त दर्शनासाठी अकोलेकर प्रचंड गर्दी करतात. मागील काही वर्षांपासून श्रीराम नवमी शोभायात्रा समितीचे सर्वसेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पुढाकारातून रामनवमीच्या निमीत्ताने शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जात आहे. शोभायात्रा पाहण्यासाठी व त्यात सहभागी होण्यासाठी अकोलेकर दरवर्षी गर्दीचे उच्चांक मोडून काढत आहेत. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर ते मोठे राम मंदिर परिसर ते सिटी कोतवाली, कापड बाजार, गांधी चौकासह विविध ठिकाणी आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी निमीत्त शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बाजारपेठ सजल्याचे दिसून येत आहे.सकाळी होणार महापुजाश्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने आमदार गोवर्धन शर्मा, समितीचे अध्यक्ष महादेवराव हुरपडे, अशोक गुप्ता, गिरीश जोशी ब्रिजमोहन चितलांगे आदींच्या उपस्थितीत मोठ्या राम मंदिरात रविवारी सकाळी ९.३० वाजता महापुजा केली जाणार आहे. भाजपासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या उपस्थितीत सायंकाळी ४ वाजता श्री राजराजेश्वर मंदिर येथून राजेश्वर महाराज व मोठ्या राम मंदिराच्या पालखीचे पुजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल.