Shubham Lonkar Akola: मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर, या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली. ही पोस्ट शुभू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक अकाउंटवर प्रथम अपलोड करण्यात आली. त्यामुळे अकोट तालुक्यातील नेव्हरी येथील शुभम लणकर याचा गत काही दिवसांपूर्वी बिश्नोई गँगसोबत असलेला संपर्क व आरोपी वृत्ती यावरून संशय आल्याने अकोला व अकोट पोलिसांनी त्याच्या मूळगावात शोध घेतला. मात्र, त्याच्यासह भावाने जून २०२४ पासून गाव सोडल्याची माहिती अकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी दिली.
अकोट शहर पोलिस स्टेशन येथे १६ जानेवारी २०२४ रोजी शुभम रामेश्वर लोणकर, प्रवीण रामेश्वर लोणकर या दोघांसह अकोट व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १० जणांविरुध्द अवैध शस्त्रसाठा प्रक्ररणी आर्म ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
शुभम लोणकरला पुणे पोलिसांनी केली होती अटक
त्यानंतर अकोट पोलिसांनी १० आरोपींना अटक केली होती. या १० आरोपींमध्ये शुभम रामेश्वर लोणकर (रा. नेव्हरी बु., अकोट) यालाही अटक केली होती. त्याचा संपर्क थेट लॉरेन्स बिश्नोई याच्या भावासोबत असल्याचे तपासा दरम्यान समोर आले होते. त्यामुळे शुभम लोणकरला ३० जानेवारी रोजी वारजेनगर, पुणे शहर पोलिसांनी अटक केली होती.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी याच गँगने स्वीकारली आहे. ही जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट शुभू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक अकाउंटवरून अपलोड झाल्याने अकोटमधील शुभम लोणकर याच्यावर संशय आला. या व्हायरल पोस्ट मागे कोण आहे, पोस्ट खरी आहे की खोटी या बाबींचा तपास आणि व्हेरिफिकेशन मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
शुभम लोणकर आणि त्याचा भाऊ फरार
अकोट पोलिस शुभम लोणकर व त्याच्या भावाचा शोध घेण्यासाठी नेव्हरी येथे जाऊन आलेत. शस्त्र प्रकरणात गुन्हा दाखल असलेले १० पैकी ८ आरोपी अकोट व अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहेत. त्यांना अकोट शहर पोलीस स्टेशनला बोलावून विचारपूस करण्यात येत आहे. शुभम लोणकर व त्याचा भाऊ प्रवीण लोणकर याचा घरी शोध घेतला असता ते घरी आढळून आले नाहीत, अशी माहिती अकोट पोलिसांनी दिली.
जूनमध्येच सोडले अकोट
बिष्णोई गँगशी संबंध असलेल्या शुभम लोणकर व त्याच्या भावाचा शोध घेणाऱ्या पोलिसांना ते दोघेही घरी आढळले नाही. त्याचे घर बंद असल्याने शेजारी विचारपूस केली असता, जून २०२४ च्या पहिल्याच आठवड्यात ते अकोट सोडून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न अकोट पोलिस करीत असून, मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती सहायक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी दिली.