लाखपुरी : मूर्तिजापूर तालुक्यातील विदर्भातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखपुरी येथे साडेअकरा ज्योतीर्लिंगांचे मंदिर आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नागपूरसह संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील लक्षेश्वर संस्थानतर्फे गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी मंदिर परिसरात शुकशुकाट दिसून आला. गुरुवारी सकाळी विधिवत पूजा करण्यात आल्यानंतर मंदिर बंद ठेवण्यात आले.
यावेळी लक्षेश्वर संस्थान मंदिर परिसरात मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनतर्फे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या संचारबंदीमुळे लाखपुरीत शुकशुकाट पाहायला मिळाला. बंदोबस्ताची पाहणी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, मूर्तिजापूर ग्रामीणचे ठाणेदार आर. जी. शेख यांनी भेट दिली. यावेळी नारायण मेजर, संजय शिंगणे, उघडे, प्रशांत सरोदे, अनिल अहेरवाल, संस्थानचे अध्यक्ष राजू दहापुते, त्रिलोक महाराज, लाखपुरीचे ग्रामविकास अधिकारी राऊत, पोलीस पाटील डिगांबर नाचणे, तंटामुक्ती अध्यक्ष नजाकत पटेल, सरपंच अजय तायडे, उपसरपंच राजू कैथवास, लक्षेश्वर संस्थानचे पदाधिकारी व सेवाधारी उपस्थित होते. (फोटो)
-------------------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लक्षेश्वर संस्थानने भाविकांना महाशिवरात्री यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती देऊन मंदिर परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. याला पंचक्रोशीतील भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.
– राजू दहापुते, अध्यक्ष, लक्षेश्वर संस्थान, लाखपुरी.