मूर्तिजापूर : ‘नाफेड’ने एक महिन्यापासून खरेदी शुभारंभ करुनही शेतकरी खरेदी केंद्राकडे फिरकला नसल्याने येथील खरेदी केंद्रात शुकशुकाट दिसून आला. आतापर्यंत एक क्विंटल ही खरेदी झाली नाही. भावाची तफावत असल्याने येथील शासकीय धान्य खरेदी केंद्रावर शेतकरी फिरकलाच नसल्याचे चित्र आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात शेतकरी माल विक्रीसाठी आणत असलेल्या धान्यामध्ये प्रामुख्याने तूर, सोयाबीन, हरभरा गहू या धान्यांचा समावेश आहे.
तालुक्यातील हातातोंडाशी आलेल्या शेकडो हेक्टर शेतीवरील गहू, हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, यासाठी शासनस्तरावर मदत मिळेल या आशेवर जीवन जगल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही.
गतवर्षी एप्रिल महिन्यात नोंदणी सुरु होऊनही ३ हजार ७०० शेतकऱ्यांनी नोंदणी करुन २ हजार ४०० शेतकऱ्यांनी ४४ हजार क्विंटल हरभरा विकला होता. तूर ६ हजार, हरभरा ५ हजार १०० या हमी भावाने खरेदी करण्यात येते चाळणी प्रक्रिया असल्याने त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे उत्कृष्ट धान्यच शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही, त्यातही ७/१२ इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. ऐवढे करुन ही चुकारे ऐन वेळी होत नाही, तिथे मालाची चाळणी प्रक्रिया होऊनही शासकीय भावातच चांगला माल खुल्या बाजारात विकल्या जात असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे का जायचे असा सवालही काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. संपूर्ण व्यवहार शेतीच्या भरवशावर अवलंबून असणाऱ्या
शेतकऱ्यांवर पेरणीपूर्व मशागत व रब्बी पेरणीचे दिवस जवळ आल्याने तसेच मुलाच्या परीक्षा फी व शालेय शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी आपला शेतीमाल नगदी पैशाने बाजार समितीत विकावा लागतो. असे असल्याने नाफेडकडे खरेदीसाठी ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तेही शेतकरी माल शासकीय खरेदी केंद्रात देतील की नाही यात शंका आहे.
----------------
खरेदी केंद्र पडले ओस
मूर्तिजापूर येथील शासकीय धान्य खरेदी केंद्र २० मार्च रोजी सुरु करण्यात आले आहे. माल विक्रीसाठी शेतकरी नोंदणी करीत असले तरी कुठलाही शेतकरी अद्यापपर्यंत खरेदी केंद्रावर फिरकलाच नाही. यापूर्वी तूर विक्रीसाठी २ हजार ७०० तर हरभरा विक्रीसाठी १७४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शासकीय खरेदी एक महिना लवकर सुरु झाली. त्यासाठी शेतकऱ्यांना मेसेजही पाठविण्यात आले आहेत, परंतु आजपर्यंत प्रत्यक्ष खरेदी केंद्रावर एकही शेतकरी फिरकला नसल्याने खरेदी केंद्रच ओस पडले आहे.
----------------------------------------
शासकीय धान्य खरेदीसाठी आमच्याकडे आतापर्यंत १ हजार ७४० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. धान्य विक्रीसाठी आणावे असे संदेश दिल्या गेले आहेत. परंतु आतापर्यंत एकाही शेतकऱ्याने माल विक्रीसाठी आणलेला नाही.
डी. एन. मुळे, व्यवस्थापक, खरेदी विक्री, मूर्तिजापूर