पातूर : जिल्ह्यासह तालुक्यात दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या वीकेंड लॉकडाऊनला तालुकावासींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविल्याचे शनिवारी दिसून आले. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद होती. त्यामुळे शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सद्यस्थितीत तालुक्यात ८३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहरासह ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दरम्यान, तालुक्यात लसीकरण सुरू असून, लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेनची नियमावली जाहीर करून शनिवार व रविवार दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित केला होता. या लाॅकलाऊनला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी चांगला प्रतिसाद दर्शविला. वीकेंड लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी शहरासह तालुक्यातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. प्रशासनाच्या वतीने कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (फोटो)
----------------------------------
कोरोना चाचणी केली नसल्यास कामे थांबणार!
कोरोनाला रोखण्यासाठी तालुका प्रशासनामार्फत उपाययोजना राबविल्या जात आहे. त्याअंतर्गत ज्या नागरिकांची कोरोना चाचणी केली नसेल त्याचे कामे थांबणार असल्याचे चित्र आहे. बँकेत व्यवहार करताना कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. कोरोना चाचणी केली नसल्यास त्याला विड्रॉल किंवा इतर व्यवहार करता येणार नसल्याचे तालुका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.